हजारो अनुयायी हभप पुरूषोत्तम पाटील महाराजांच्या चरणी लिन
शशिकांत मोरे
धाटाव : संपूर्ण देशात गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज धाटावमध्ये असंख्य चाहत्यांच्या, अनुयायांच्या उपस्थितीत गुरुौर्णिमेनिमित्त रायगडसह इतर जिल्ह्यातून, विभागातून महाजनसमुदाय रविवारी धाटावमध्ये लोटल्याचे पहावयास मिळाले.
रविवारी (दि. २१ जुलै) गुरुपौर्णिमेनिमित्त रायगड जिल्ह्यासह इतर विभागातून हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे असंख्य अनुयायी धाटावमध्ये हजर झाले. आपल्या गुरुवर निस्सीम प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस असल्याने पहाटेपासूनच त्यांच्या घरासमोर अनुयायांची भली मोठी रांग लागल्याचे पहावयास मिळाले. दुग्धाभिषेक केल्यानंतर त्यांना औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या असंख्य अनुयायांना उपकृत केले. यावेळी रायगडसह इतर जिल्ह्यातील त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिपाठ, कीर्तन आणि प्रबोधन झाल्यानंतर उपस्थित सर्व अनुयायांमध्ये आपण दर्शन घेतल्याचा आनंद पहावयास मिळाला. धाटावमध्ये रविवारी हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या अनेक अनुयायांचा सागर हा गुरुभक्तांच्या रूपाने उसळल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान हजारो अनुयायांच्या चेहऱ्यावर हभप पुरूषोत्तम पाटील महाराजांच्या चरणी लिन होऊन दर्शन घेतल्याचे समाधान पहावयास मिळाले.