नाला तुंबलेल्याने उरण-करंजा रस्त्यावर पाणी
अनंत नारंगीकर
उरण : मान्सून पुर्व नालेसफाईच्या कामासाठी सिडको प्रशासनाने लाखांचा निधी उरण तालुक्यातील सिडको बाधित ग्रामपंचायत हद्दीत खर्च केला आहे. परंतु, सिडको आणि ठेकेदारांच्या साटेलोटे कारभारामुळे नालेसफाईची कामे ही कागदावरच राबविण्यात आल्याने नाल्यातील घाणीचे पाणी रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्यावर वाहताना दिसत असल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

स्वच्छ सुंदर शहराचे शिल्पकार अशी ओळख असणाऱ्या सिडकोला भ्रष्ट कारभाराची किड लागल्याने अनेक जनहिताची कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. त्यात काही कामे ही सिडको आणि ठेकेदारांच्या साटेलोटे कारभारामुळे कागदावरच होत असल्याने त्याचा त्रास हा नाहक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यात २०२४ या वर्षाच्या मान्सून पुर्व नालेसफाईच्या कामासाठी सिडको प्रशासनाने लाखांचा निधी उरण तालुक्यातील सिडको बाधित ग्रामपंचायत हद्दीत खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा डंका वाजवला होता. परंतु, पावसाने यावर्षी सिडकोच्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल केल्याचे चित्र तालुक्यातील सर्रास सिडको बाधित ग्रामपंचायत हद्दीत पहावयास मिळत आहे. त्यात प्रवाशांच्या दुष्टीने महत्वाचा असलेल्या उरण-करंजा या रहदारीच्या रस्त्यावर नाल्यातील (गटारातील) घाणीचे पाणी वाहत असल्याने प्रवाशी नागरीकांना घाणीच्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. तरी सिडकोने नालेसफाईची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी रहिवाशी करत आहेत.

सिडको द्रोणागिरी नोड या कार्यालयाचे अभियंता एम. एम. मुंडे यांना सिडको बाधित ग्रामपंचायत हद्दीतील नालेसफाईच्या कामासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे सिडकोच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार की सिडकोच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची पाठराखण करणार? असा सवाल जनमानसात व्यक्त केला जात आहे.