बापवन येथील विद्यार्थ्यांनी घेतला शेतीचा प्रत्यक्ष अनुभव
गणेश प्रभाळे
दिघी : जेवणाच्या ताटात येणारा भात नेमका कसा पिकतो व शेतकरी त्यासाठी किती काबाडकष्ट करतात याचा प्रत्यक्ष अनुभव श्रीवर्धन तालुक्यातील बापवन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला. मुख्याध्यापक मनोज माळवदे यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांना शेतात जाऊन शेतीचे धडे देण्यात आले.
श्रीवर्धन तालुक्यातील बापवन गावातील या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत वर्ग आहेत. कृषिप्रधान देशातील मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न घेता त्यांच्यात विविध कौशल्य विकसित व्हावीत आणि शेती विषयक आवड निर्माण होऊन भविष्यात शेतीकडे ओढ निर्माण होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शेतावर नेऊन शेतीविषयक प्रत्यक्ष माहिती व अनुभव देण्यात आले. यावेळी शेतीच्या मशागतींची ओळख व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतावर नेऊन भात शेतीच्या लावणीची ओळख करून देण्यात आली. मुलांनीही भात लावणीचा मनमुराद आनंद घेतला. नेहमीच्या शालेय जीवनापासून एक वेगळाच अनुभव घेताना मुले खूप आनंदी होती. यावेळी शेतकरी दादाला विद्यार्थ्यांनी शेतीविषयक अनेक चिकित्सक प्रश्न विचारून माहिती मिळविली.
बापवन शाळेने केलेल्या या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक मनोज माळवदे, उपशिक्षक विभाकर सुर्वे व सर्व विद्यार्थी यांचे शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, विस्तार अधिकारी धर्मा धामणकर, केंद्रप्रमुख भिकू पांगारकर, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती तसेच मुंबई मंडळ यांनी कौतुक केले.
कोकणात डोंगर उतारावर नाचणी, वरी, भात यांसारख्या पिकांचे प्रमाण आता दिवसेंदिवस कमी होत आहे. ते वाढणे गरजेचे आहे. त्यासाठीच प्रत्यक्ष शेतात जाऊन विद्यार्थ्यांना शेतीबाबत माहिती देऊन व शेती कशी केली जाते, मशागत म्हणजे काय, ती कशी करतात हे विद्यार्थ्यांनी अनुभवले.
-मनोज माळवदे,
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा बापवन