वेळास ते सर्वा मार्ग ठरतायेत धोकादायक!
गणेश प्रभाळे
दिघी : जिल्ह्यासह श्रीवर्धन तालुक्यातील पावसाचे प्रमाण मोठया प्रमाणात आहे. पावसाचा जोर वाढला की येथे वादळी व मुसळधार पावसामुळे कोणत्याही स्वरूपाचा धोका जाणवतो. गेली चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रविवारी रात्री वेळास – सर्वा मार्गावर तसेच कोंढेपंचतन येथे दरड कोसळल्याने वाहनचालकांवर भीतीचे सावट पसरले आहे.
तालुक्यातील बोर्लीपंचतन शहारानजिक असणाऱ्या कोंढेपंचतन गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री दरड कोसळली. मुसळधार पाऊस व त्यात माती मिश्रित पाणी यामुळे मातीचा ढिगारा काढण्यात अडचणी येत होत्या. रस्त्यालगतची माती पूर्ण भुसभुशीत झाली असून पावसामध्ये रस्त्यावर येत आहे. त्यामुळे माती काढण्याचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले. सोमवारी दुपारपर्यंत माती हटविण्याचे काम सुरूच होते.
याच दरम्यान रविवारी रात्री आदगाव ते सर्वा मार्गावर दरड कोसळण्याची दुसरी घटना घडली आहे. यामध्ये चार मोठे दगड रस्त्यावर येऊन आदळले आहेत. या मार्गावर गतवर्षी देखील अशी घटना घडली असून, यावर्षी सुद्धा सुरुवातीच्या पावसात छोट्या-मोठ्या दरडी रस्त्यावर आल्या आहेत. सद्यस्थितीत वेळास – सर्वा मार्ग धोकादायक बनला आहे. कारण दरड प्रवण क्षेत्र बनलेल्या या मार्गावर प्रवाशांमध्ये भिती कायम आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तुषार लुंगे व शेट्टे यांनी वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी खबरदारी घेत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दरड हटवून प्रवासासाठी रस्ते मोकळे केले आहेत. तरी अतिवृष्टीने या मार्गावरील धोका वाढत आहे. याकडे संबधित खात्यांनी आपापली जबाबदारी ओळखून तिथे कोणताही अपघात होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यावी व या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक प्रवाशी करत आहेत.