मोठा अनर्थ घडण्याची शक्यता
विनायक पाटील
पेण : मळेघर येथील असलेल्या ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रीकल पोल पूर्णताः खराब झाले असून गंजालेल्या खांबाला दगडाचा आधार असून दोन्ही खांब पूर्णतः एका बाजूला वाकलेल्या अवस्थेत पहायला मिळत आहेत. वादळी वारा, पाऊस यामुळे सदरचे खांब केव्हाही कोसळून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत महामंडळाने सडलेले खांब त्वरीत बदलण्याची मागणी मळेघर ग्रामस्थांकडून होत आहे.
गेल्या वर्षभरापासून सदरचा टान्स्फॉर्मर बसवलेले इलेक्ट्रीक पोल गंज पकडून खालच्या बाजूने निकामी झाले आहेत. सदरच्या खांबाला पाठीमागून एका दगडाचा आधार मिळाला आहे तरीही संपूर्ण खराब झालेला खांब एका बाजूला झुकल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे केव्हाही कोसळून मोठा अनर्थ घडू शकतो. याबाबत मळेघर ग्रामपंचायतीमार्फत विद्युत महामंडळास रीतसर तक्रार देऊन सदरचा पोल बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र ,गेल्या वर्षभरापासून याकडे दुर्लक्ष होत असल्याने मोठी दुर्घटना घडल्यानंतर वीज मंडळाला जाग येणार का? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
