घन:श्याम कडू
उरण : चाणजे ग्रामपंचायत क्षेत्रातील करंजा ते उरण रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झालेली दिसते आहे. यामुळे वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या खड्ड्यांमुळे काही काळ वाहतूक कोंडी होते. अशा खड्डेमय रस्त्यांना कारणीभूत कोण आहे, चाणजे ग्रामपंचायत की कंत्राट घेणारे कंत्राटदार हा सवाल येथील जनतेला पडला आहे. जे रस्त्याचे ठेके घेतात ते हलक्या प्रतीचे मटेरियल वापरतात. त्यामुळे रस्त्यांची लवकर दुर्दशा होते. रस्ता नवीन बनवल्यानंतर एक वर्षही व्यवस्थित राहत नाही. अनेकदा तर पहिला पाऊस पडला की रस्त्यावर खड्डे पडतात आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो.”करंजा गावची पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची गेली कित्येक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. याकडे कोणाचे लक्ष जात नाही.

एप्रिल मे महिन्यात बारीक भुसा टाकून खड्डे बुजवण्याचे काम करत रस्त्याना मलम लावण्याचा प्रकार केला पण त्यानंतर पडलेल्या पावसामुळे थुकपट्टी लावलेले वाहून गेले आणि आता परत खड्डे दिसू लागले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.या खड्ड्यांबाबत वारंवार तक्रार करूनही हे खड्डे भरले जात नाहीत. वास्तविक जो कंत्राटदार रस्ता बनवतो त्याचीच खड्डे बुजवायची जबाबदारी असली पाहिजे. पण काही अधिकाऱ्यांचे कंत्राटदार यांच्याशी साटेलोटे व आर्थिक व्यवहार असल्यामुळे त्यांना काहीही बोलत नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे.

हा रस्ता जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीखाली असून त्यांना ३ ते ४ वेळा पत्रव्यवहार करून खड्डे बुजवण्यास सांगितले आहे. पण ते काही करत नाही. रस्त्यावर खड्डे पडल्याचा जास्त त्रास रिक्षावाल्यांना होतो. खड्ड्यांमुळे कधी अपघात होईल का अशी भीती सतत भेडसावत असते. रिक्षा खड्ड्यामधे आपटून मोठे नुकसान होत असते. रस्त्याची ठिकठिकाणी अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्यावर वाहन चालवणे चालकांसाठी मुश्किल झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर लाखों रुपये खर्च करण्यात आले होते. परंतु पावसात पुन्हा जैसे थे परिस्थिती ओढअवली आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असतात त्यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. तर जीप इंजिनिअर योगेश नागावकर यांनी सदरचा रस्ता हा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून जिओ व जलमिशन पाणीपुरवठा यांनी खोदकाम केल्याने त्यांनी तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपअभियंता राहुल देवांग यांच्या सहीचे पत्र पाठवून काही महिन्याचा अवधी उलटूनही संबंधित ठेकेदार यांनी केराची टोपली दाखविली आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे अभियंता हे आर्थिक साटेलोटामुळे संबंधित ठेकेदार व जिओ, जलमिशन ठेकेदारावर पुढील कारवाई करण्यास कचरत असल्याचे उघड होत आहे.
सदर रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी परवानगी ग्रामपंचायतने देताना कोट्यवधी रुपये घेतले आहेत. ते कोणाच्या घशात गेले याची माहिती नाही. जिओ कंपनीने १ कोटीच्यावर ग्रामपंचायतला रक्कम दिली आहे. ती ग्रामपंचायतमध्ये जमा झाली नसल्याचे समजते. यावरून तक्रारदारांनी केलेल्या तक्रारींवर ग्रामविकास अधिकारी याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्याची वसुली कोणी करायची याबाबत कोणीच अधिकारी बोलण्यास तयार नाही. यावरून यामध्ये जिल्हा परिषद, उरण पंचायत समिती व ग्रामपंचायत चाणजेच्या अधिकारी वर्ग सत्ताधाऱ्यांचे हात बरबटलेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भ्रष्ट कारभारामुळे करंजा रस्त्याची पावसाळ्यात नेहमीच चालणं होते याकडे लक्ष देण्यास कोणा राजकीय नेत्यांना वेळ नसल्याची ओरड सुरू आहे.
पावसाळ्यापूर्वी ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्याच ठिकाणचे खड्डे डांबरीकरण करुन बुजविण्यात आले होते. दोन महिन्यांत पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे त्या ठेकेदाराची व अधिकारी वर्गाची सखोल चौकशी व्हावी.
-सचिन डाऊर
सामाजिक कार्यकर्ते
