अतिवृष्टीमुळे नदीला महापूर, कुसुंबळे गावासह पाच गावांचा संपर्क तुटला
सलीम शेख
माणगाव : गेली आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने चांगले झोडपून काढले असून नद्यांना महापूर आला आहे. तसेच भातशेती पाण्याखाली गेली आहे. या अतिवृष्टीमुळे बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोशिंबळे गावाजवळून जाणाऱ्या काळनदीला महापूर आल्याने कोशिंबळे नदीवरील बंधाऱ्यावर उभारण्यात आलेल्या पुलाचे संरक्षक लोखंडी कठडे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या जीव धोक्यात आला आहे. तसेच पाच गावांचा संपर्क तुटला आहे.

गेले दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला होता. त्यातच २५ जुलै रोजी पहाटे १.३० वाजण्याचे सुमारास काळ नदीला महापूर आला आणि या पुराच्या पाण्यात कोशिंबळे-निजामपूर मार्गावरील काळ नदीवर ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या धरणाच्या पुलावरून पुराचे पाणी गेल्याने लोखंडी संरक्षक कठडे वाहून गेले.
या कठड्यामुळे कोशिंबळे व त्या परिसरात असणारी कोशिंबळे, कोशिंबळे आदिवासीवाडी, भिंताड, पानसई, इंदापूर यासह चार ते पाच गावांचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासी तसेच विद्यार्थी व नागरिकांना या पुलावरून जाताना धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने हे संरक्षक कठडे ताबडतोब बांधावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
