• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मनोरुग्ण महिलेला निर्भय म्हात्रे यांनी केले पोलीसांच्या मदतीने नातेवाईकांच्या स्वाधीन

ByEditor

Jul 26, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
कोप्रोली युनियन बँक परिसरात गेल्या चार-पाच दिवसापासून भटकंती करणाऱ्या सुशिक्षित परंतु, मनोरुगण असलेल्या कल्याण येथील महिलेला सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक नेते निर्भय म्हात्रे यांनी भर पावसात आधार देत कोप्रोली गावच्या पोलीस पाटील सुरणी कोळी तसेच उरण पोलीसांच्या मदतीने सामाजिक बांधिलकी जपत तीच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्याचे काम केले आहे.

नवीमुंबई परिसरातील अक्षता म्हात्रे या असहाय्य महिलेच प्रकरण डोळ्यासमोर असताना भर पावसात एक सुशिक्षित परंतु मनोरुग्ण महिला हि उरण-कोप्रोली नाक्यावरील युनियन बँकजवळील रस्त्यावर रात्री अपरात्री फिरत असल्याची बाब कोप्रोली गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक नेते निर्भय म्हात्रे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सदर महिलेची विचारपुस केली. परंतु मनोरुग्ण असलेल्या महिलेनी काही संभाषण न करता जाणे पसंत केले. भर पावसात सदर महिला कुठे जाणार ही बाब निर्भय म्हात्रे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या घटनेची माहिती कोप्रोली गावातील पोलीस पाटील सुरणी कोळी यांना दिली आणि महिलेला जेऊ घातले, कपडे, पांघरुण दिले.

पोलीस पाटील सुरणी कोळी यांनी सदर महिलेची माहिती उरण पोलीसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल धनराज बडगुजर, कॉन्स्टेबल सचिन कडू, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका पाटील, पोलीस ड्रायव्हर नागेश गिरी यांच्या मदतीने उरण पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले. उरण पोलिसांनी तपास सुरू केला असता सदर महिलेचा भाऊ शशिकांत अंबासराव कांबळे कल्याण पूर्व जिल्हा ठाणे येथे असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी सदर मनोरुग्ण महिलेला तिच्या नातेवाईकांकडे सुखरूप पोहोचवले असल्याने सामाजिक कार्यकर्ते निर्भय म्हात्रे, पोलीस पाटील सुरणी कोळी व उरण पोलीस यंत्रणेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!