गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील सालवड येथील एका महिलेची लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच आज दि. २६ जुलै रोजी कर्जत शहरातील भिसेगाव येथील वेताळ मंदिराच्या समोरील वडाच्या झाडाला एका २८ ते ३० वर्षीय तरूणाने दोरानी गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. सदर तरूण हा नाशिक येथील राहाणारा असल्याचे व नाव अमित हेमंत तिवारी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कर्जत तालुका हादरला आहे.
कर्जत नांगुर्ले आदिवासी वाडी येथील काही आदिवासी बांधव हे कामानिमित्त सकाळचे ९ ते ९.३० वाजण्याचे सुमारास भिसेगाव वेताळ देवस्थान या परिसरातून जात असताना, वेताळ देवस्थान परिसरातील असलेल्या वडाच्या झाडाला एक तरूण दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसुन आला. सदर प्रकार हा त्यांनी भिसेगावातील त्यांच्या ओळखीच्या ग्रामस्थांना सांगितल्याने ग्रामस्थ यांनी भिसेगावाचे पोलीस पाटील संजय हजारे यांना माहिती दिली. पोलीस पाटील संजय हजारे यांनी सदर घटनेची खबर पोलीसांना दिली असता, कर्जत पोलीसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहाणी करून सदर तरूणाचा लटकलेलेल्या अवस्थेतील मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने खाली उतरवून शवाविच्छेदनासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरूण हा नाशिक येथील राहाणार असून त्याचे नाव अमित हेमंत तिवारी असल्याचे निष्पन्न झाले. सदर तरुण हा विवाहीत असून कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या कुटुंबीयांना याबद्दलची माहिती दिली असून त्याचे कुटुंबीय नाशिकहून घटनास्थळी दाखल होत असल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटनेचा तपास कर्जत पोलिस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या अधिपत्याखाली पोलिस उप निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस नाईक अविनाश कांबळे, पोलीस शिपाई आकाश राठोड, पोलीस शिपाई राहुल राठोड, पोलीस शिपाई संदीप माळी, पोलीस शिपाई रविंद्र लोहकरे हे करीत आहेत.