क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने २१ जुलै 2024 रोजी पुणे येथे क्रिकेट पंचांची पूर्वचाचणी परीक्षा घेण्यात आली होती. एमसीएच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यातील एकूण ४८३ उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. प्रत्यक्ष परीक्षेला ३८१ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यामध्ये केवळ ६८ उमेदवार ८० टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करून उतीर्ण झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील एकूण १४ जणांनी हि परीक्षा उत्तीर्ण करून सरशी मिळवली आहे. एमसीएच्या मुख्य स्टेट पॅनल पंच परीक्षेसाठी आता हे उमेदवार पात्र ठरले आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातुन संकेश ढोले, पुरुषोत्तम भगत, अभिजित वाडकर, पेण तालुक्यातून सागर मुळे, उरणमधून प्रशांत माळी, वरुण म्हात्रे, संदेश बळीराम म्हात्रे, रोहन पाटील, संदेशकुमार म्हात्रे, पनवेलमधून विघ्नहर्ता मुंढे, अरमान शेख, राजेश शिंदे, रसायनीमधून निशांत माळी तर खालापूर तालुक्यातून प्रवीण देशमुख असे १४ पंच उतीर्ण झाले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने पंच परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी बीसीसीआयचे पंच रोहन इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवस कार्यशाळा वर्गाचे आयोजन केले होते . तसेच उरणचे क्रिकेट नियमांचे तज्ञ व प्रशिक्षक नयन कट्टा यांनी पुढाकार घेऊन बीसीसीआयचे पंच हर्षद रावले व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच राजन कसबे यांच्या सहकार्याने सतत आठ दिवस ऑनलाईन पद्धतीद्वारे परिक्षेस बसलेल्या पंचांना उत्तम प्रशिक्षण देऊन परीक्षेची तयारी करून घेतली.
आरडीसीएसाठी रायगड जिल्ह्यातील सर्व पंचांच्या प्रशिक्षण शिबीराचे यशस्वी आयोजन व्हावे यासाठी आरडीसीए सदस्य यशवंत साबळे, राजेश पाटील, समीर मसुरकर, प्रदिप खलाटे व एमसीए स्टेट पॅनल पंच ॲड. पंकज पंडित, सुयोग चौधरी, चंद्रकांत म्हात्रे, शंकर दळवी, विनय पाटील, विनोद सोलंकी यांनी परिश्रम घेतले. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात एमसीएमार्फत उत्तीर्ण झालेल्या सर्व पंचांना मुख्य परिक्षेपूर्वी दोन दिवसीय कार्यशाळा शिबिराचे वर्ग व ऑनलाईन मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. एमसीए आयोजित पंचांच्या पूर्वतयारी परीक्षेत रायगड जिल्ह्याच्या मुलांनी यश मिळवल्याबद्दल आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांनी सर्व उत्तीर्ण झालेल्या तसेच परीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व तज्ञ प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत.