विशेष प्रतिनिधी
रायगड : भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळणार कि नाही? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वेळोवेळी प्रसार माध्यमांसमोर भरतशेठ यांनी भूमिका मांडताना आपल्याला १००१ टक्के मंत्रिपद मिळणार असे ठामपणे सांगितले आहे. मात्र राष्ट्रवादीत झालेल्या भूकंपानंतर आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि ‘कानामागून आली आणि तिखट झाली’ अशी काहीशी स्थिती निर्माण झाली. त्यातच रायगडचे पालकमंत्रिपद पुन्हा तटकरेंना मिळणार अशी चर्चा जिल्ह्यात रंगू लागली. याच चर्चेने भरतशेठ यांचे टेन्शन वाढवले आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असतानाच महाडचे आमदार भरतशेठ गोगावले हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तब्बल वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळणार आहे. मात्र आपल्यालाच मंत्रिपद आणि पालकमंत्री पद मिळणार हे सांगतानाच त्यांनी आदिती तटकरे यांच्याविषयी बोलताना महिलांचा अवमान होईल, असे वक्तव्य केले आहे. मंत्रिपदासोबत आपल्याला रायगडचे पालकमंत्रीपद मिळणारच, हे भरत गोगावले फार पूर्वीपासूनच ठामपणे सांगत होते. मात्र आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तटकरे यांचे नाव देखील पालकमंत्र्यांच्या शर्यतीत आले आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून पालकमंत्री पदाची माळ तटकरेंच्याच गळ्यात पडेल अशी जोरदार चर्चा आहे.
खरंतर पहिल्या फेरीतच भरतशेठ यांना मंत्रिपद मिळणं अपेक्षित होत. मात्र मागील वर्षभर संयम राखत भरतशेठ मंत्रिपदावर दावा सांगत आहेत. राष्ट्रवादीच्या सहभागामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या अनेकांना मंत्रिपद मिळणे कठीण झाले आहे. हे नेते सध्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावत आहेत. पण ‘मंत्रिपदे कमी आणि इच्छुक जास्त’ या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडत आहे. त्यातच काँग्रेसचा एक गट भाजपसोबत येण्याची शक्यता आहे. हा गट सोबत आल्यास त्यांना तीन मंत्री पदे देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप रखडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे भरतशेठ यांच्या मंत्रिपदाला हुलकावणी मिळत आहे.
