न्हावा ग्रामस्थांची न्हावा शेवा पोलीस स्टेशनवर धडक
गावातल्या आरोपीविरोधात समस्त न्हावा ग्रामस्थ पक्षभेद न बाळगता एकवटले!
घन:श्याम कडू
उरण : पनवेल तालुक्यातील न्हावा गावामध्ये एका २४ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. प्रीतम अरुण म्हात्रे या नराधमाने तिला यमसदनी पाठवण्याच्या उद्देशाने लोखंडी रोडने तिच्या डोक्यात व पाठीवर प्रहार केले. या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला प्रचंड मोठी खोलवर जखम होऊन भयंकर रक्तस्त्राव झाला. त्या तरुणीच्या मैत्रिणीने आरडाओरड केल्यानंतर तात्काळ त्या तरुणीला उलवे नोड येथील दवाखान्यात दाखल केले. तरुणीचा जीव थोडक्यात बचावला आहे अन्यथा, तिलाही जगाचा निरोप घ्यावा लागला असता.

या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले. समस्त न्हावा ग्रामस्थ पक्षभेद न बाळगता एकवटले. न्हावा शेवा पोलीस स्टेशनवर शांततेच्या मार्गाने मात्र आपल्या भावना उग्रपणे प्रकट करत धडक दिली. न्हावा गावातील सर्व पक्षीय नेते मंडळी, तरुण, महिला भगिनी या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या. नवी मुंबईतील बेलापूर येथील अक्षता म्हात्रे व उरणमधील यशश्री शिंदे या दुर्दैवी भगिनींना नुकतेच क्रूरपणे ठार मारल्याचे प्रकरण ताजे असताना न्हावे गावातील २४ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात प्रचंड तणाव होता. अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदे यांचे मारेकरी हे परप्रांतीय होते. मात्र, न्हावे गावातील त्या तरुणीवर जीवघेणा हल्ला करणारा हा त्याच गावातील होता. गावातील सर्वजण एकमेकांशी जवळच्या अथवा लांबच्या नात्यांनी जोडले आहेत. नाही म्हणायला ते सर्वजण एकमेकांचे नातेवाईकच आहेत. महत्वाची बाब म्हणजे हल्लेखोर प्रीतम म्हात्रे याला कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी मोर्चामध्ये सामील झालेले अनेक जण प्रीतम म्हात्रेचे नातेवाईकही आहेत.
पोलीस स्टेशनला धडक दिल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहूल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जमाव प्रक्षुब्ध होता, महिला भगिनी तर हल्लेखोराला आमच्या ताब्यात द्या, त्याची धिंड काढा अशीच मागणी करीत होते. प्रमुख नेत्यांमध्ये शिवसेनेचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शेकापचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, जासई सरपंच संतोष घरत, भाजप तालुका उपाध्यक्ष पंडितशेठ घरत, भाजपचे न्हावा गावचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिचंद्र म्हात्रे, माजी अध्यक्ष रवींद्र पाटील, रमेश भोईर, आशिष पाटील, चंद्रकांत घरत, महेंद्र पाटील, हनुमान भोईर, कृष्णा भोईर, शेकापचे युवानेते रमाकांत म्हात्रे, गजानन म्हात्रे, विजया ठाकूर, जानुबाई मचांदू, मानसी पाटील, अमृता पाटील, उज्वला भोईर, शांताबाई म्हात्रे, मीनाक्षी पाटील, रंजना घरत, शोभा भोईर, कोमल ठाकूर, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच न्हावे गावच्या रणरागिणी मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.
यावेळी उपस्थित नेते मंडळींनी हल्लेखोर प्रीतम म्हात्रे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, पोलिसांनी चार्जशीट फाईल करताना योग्य कलम लावून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सहकार्य करावे. हा आरोपी सुटू नये आणि भविष्यात काही कालावधीसाठी सुटला, तरी त्याला न्हावा गावासह परिसरातून हद्दपार करावे, कलम लावताना आरोपीस असे शासन व्हावे की, भविष्यात पुन्हा असे गुन्हे घडू नये यासाठी गुन्हेगाराला योग्य अद्दल घडावी, अशी मागणी करण्यात आली.
पोलीस प्रशासनातर्फेही सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहूल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घडलेल्या गुन्ह्याबद्दल हल्लेखोर आरोपी प्रीतम अरुण म्हात्रे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला असून त्याला कठोरात कठोर शासन होईल, अशी ग्वाही दिली.