अनंत नारंगीकर
उरण : जेएनपीए बंदराच्या अखत्यारीत असलेल्या स्पिडी या कंटेनर हाताळणी करणाऱ्या गोदामात आग लागण्याची घटना मंगळवारी (दि. ३०) सकाळी ठिक १०-३० च्या सुमारास घडली आहे. या आगीची तीव्रता एवढी होती की आगीचे लोट हवेत उडाल्याने कामगार व गावकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत.

जेएनपीए बंदराच्या अखत्यारीत असलेला स्पिडी हा मालाची हाताळणी करणारा महत्वाचा गोदाम आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात देश, परदेशात आयात निर्यात करणाऱ्या मालाची साठवणूक केली जाते. तसेच बंदर परिसरात सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले कंटेनर सिल करुन येथे ठेवले जात आहेत. अशा महत्त्वाच्या असलेल्या स्पिडी या कंटेनर हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी (दि. ३०) सकाळी १०-३० च्या सुमारास आग लागल्याची दुदैवी घटना घडली आहे. सदरची आग ही स्पिडी गोदामातील कार्यालयाला लागल्याची माहिती समोर येत असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्राप्त होत आहे.
या आगीची माहिती जेएनपीए बंदरातील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. आगीचे लोट हवेत उडाल्याने कामगार व गावकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते.