सलीम शेख
माणगाव : शिवसेना ठाकरे गटाचे गटाचे उपविभाग प्रमुख व गेले अनेक वर्षे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे हरहुन्नरी शिवसैनिक महादेव कदम यांनी माणगाव येथे रविवार, दि. २८ जुलै २०२४ रोजी श्रीवर्धन विधानसभा प्रमुख प्रशांत शिंदे व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमा प्रसंगी बोलताना प्रवेशकर्ते महादेव कदम यांनी सांगितले की, शिवसेना पक्ष हा ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घालून नावारूपाला आणला होता. स्व.बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक वर्षे कोणत्याही स्वार्थाशिवाय आम्ही भगव्याची इमानेइतबारे सेवा केली, परंतु आताच्या नेतृत्वाने काँग्रेस व शरद पवारांची साथ धरल्याने शिवसेनेच्या विचारांचा मुळ गाभाच हरपला आहे. हिंदुजन व मराठी माणसाच्या हितासाठी प्रसंगी स्वतःचे रक्त सांडणाऱ्या शिवसैनिकांना आज मेहबुबा मुफ्ती आणि सोनिया गांधी यांच्या कार्यकर्त्यांसमवेत काम करावे लागत आहे, हिच खरी शोकांतिका आहे व त्यामुळेच आपल्याला हे संधीसाधू राजकारण सहन होत नसल्याने देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे नेतृत्व स्वीकारून भाजपाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा जागर होत असल्याने मी पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले.
यावेळी माणगाव तालुकाध्यक्ष उमेश साटम, म्हसळा तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, तालुका सरचिटणीस गोविंद कासार, लोकसभा विस्तारक रमेश ढेबे, युवा मोर्चा शहराध्यक्ष राजू तेटगुरे, उपाध्यक्ष केतन अडीत, सरचिटणीस अमोल पवार व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.