पनवेल : मागील दोन वर्षांपासून तळोजा कारागृहात कर्नाळा बॅंक गैर व्यवहारात अटकेत असलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी कारागृहातून प्रसिद्ध पत्रक जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय राजकारणातून राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

विवेक पाटील हे शेकापमध्ये १९७९ पासून सक्रिय होते. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती तसेच चार वेळा विधानसभा सदस्य म्हणून ते निवडून आले होते. २० वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी पनवेलमधील लेडीज सर्व्हिसबारमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा विधिमंडळात मांडल्यानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदी राज्यात लागू केली होती. चार वर्षांपूर्वी विवेक पाटील यांच्यावर ते अध्यक्ष असलेल्या कर्नाळा बॅंकेत त्यांनी ५४८ कोटी रुपयांचा गैर व्यवहार केल्याचा आरोप भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.
विवेक पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र आणि बॅंकेच्या इतर संचालकांवर कारवाई सुरू असताना विवेक पाटील यांनी शेकापमधून राजीनामा दिल्याची घोषणा केल्याने पनवेल व उरण परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.