• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाला बेदम मारहाण; नेरळ येथील घटना

ByEditor

Aug 3, 2024

नेरळ पोलीस ठाण्यात दामत गावातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल

गणेश पवार
कर्जत :
नेरळ येथे सीएनजी पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी एक तरुण गेला असता रिक्षात बसलेल्या आपल्या बहिणीला त्याने बाहेर उतरवले. मात्र, ती तरुणी बाहेर उभी असताना त्याच पंपावर गॅस भरण्यासाठी आलेल्या इतर चार तरुणांनी तिची छेड काढली. हा प्रकार भावाला समजल्यावर त्याने त्या तरुणांना जाब विचारला असता त्यांनी भावाला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणानंतर भावाने नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रार दाखल होताच तात्काळ आरोपींना नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आकाश प्रकाश पाटील हा तरुण रिक्षा चालवतो. दि. २ ऑगस्ट रोजी या आकाश हा नेरळला सीएनजी गॅस भरण्यासाठी आला होता. तसेच यावेळी त्याची बहीण देखील सोबत होती. सीएनजी गॅस पंपावर वाहनात गॅस भरताना वाहन निर्मनुष्य असावे लागते. त्यामुळे आकाशने बहिणीला बाहेर उतरवून तो गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगेत रिक्षा घेऊन थांबला. त्याचवेळी तिथे स्विफ्ट गाडीतून दामत गावातील मुझमिल मलिक बुबेरे, फरान नासिर नजे, रियाज मो. बिलाल शेख यासह एक अल्पवयीन मुलगा हे सुद्धा दाखल झाले होते. थोड्यावेळानंतर रिक्षात सीएनजी भरुन आकाश आल्यानंतर त्याला त्याची बहीण घाबरलेली दिसली. म्हणुन तिला काय झाले असे विचारले. तेव्हा आपण बाहेर थांबलो असताना स्विप्ट गाडीतुन चार जणांनी माझ्याकडे वाईट नजरेने पाहुन अश्लील इशारे केले असल्याचे तिने सांगितले. तेव्हा आकाशला या गोष्टीचा राग येऊन त्याने तिथेच असलेल्या त्या चार जणांना याबाबत जाब विचारला. तेव्हा त्या चार जणांनी आकाशलाच हाताबुक्यानी बेदम मारहाण केली. तर त्यातील एका इसमाने त्याचे हातातील कड्याने आकाशच्या डोक्यात मारून डोक्यास गंभीर स्वरूपाची दुखापत करत पळ काढला. त्यामुळे जखमी झालेल्या आकाशने बहिणीसह नेरळ पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकारबाबत तक्रार दाखल केली. हा प्रकार बघता बघता संबंध परिसरात समजल्याने नेरळ पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला. नुकत्याच झालेल्या उरण येथील यशश्री शिंदे हत्येच्या पार्श्ववभूमीवर जमलेले नागरिक आक्रमक झाले.

नेरळ पोलिसांनी याबाबत भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ७९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करत तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला. तर यानंतर मुझमिल मलिक बुबेरे, फरान नासिर नजे, रियाज मो. बिलाल शेख यांना पोलिसांनी अटक करून आज दि. ३ ऑगस्ट रोजी न्यायलयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे हे अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!