• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे उपोषण

ByEditor

Aug 5, 2024
संग्रहितसंग्रहित

घनःश्याम कडू
उरण :
तालुक्याच्या किनारी भागात मोठ्या प्रमणात धनदांडग्यांनी केलेले सीआरझेड कायद्याचे उल्लंघन, तालुक्यात तहसिल कार्यालयाकडीलच यादीनुसार असलेले बेकायदा कंटेनर यार्डांचे पीक आणि उरण शहराला लागून बोरी पाखाडीत वसलेला ‘मिनी कुर्ला’ उठविण्यात प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या सततच्या अर्थपुर्ण कानाडोळाच्या निषेधार्थ आता दस्तुरखुद्द उरणचे पत्रकारच आंदोलन करणार आहेत. तालुक्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या तहसिलदारांना उरण तालुका मराठी पत्रकार संघाने यापुर्वीच उपरोक्त सर्वच विषयांवर अवगत केलेले असतांनाही संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उपोषणास्त्र उगारले आहे. त्या संबंधीचे लेखी पत्रच उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उरण तहसिलदारांना देऊन या उपोषणाची घोषणा केली आहे.

उरण तालुक्यात तहसिल कार्यालयाच्यावतीनं जाहिर केलेल्या यादीनुसार सुमारे 80 पेक्षा जास्त अनधिकृत कंटेनर यार्ड आणि गोदामे आहेत. या सर्व गोदामांवर थेट बंदीची कारवाई करावी अशी सुरूवाती पासूनची मागणी आहे. मात्र, अशा बेकायदेशीर कंटेनर यार्ड आणि गोदामांवर प्रत्यक्ष कारवाई मात्र होतांना दिसत नाही. महसुल विभागाकडून केवळ जुजबी दंडात्मक कारवाया करून पुन्हा संबंधितांना बेकायदेशिर गोदामे चालविण्याचा जणू अलिखित परवानाच दिला जात आहे. या बेकायदेशीर गोदामे तसेच यार्डकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसल्याने या यार्ड व गोदामांशेजारील 28 रस्त्यांच्या मार्गांवर दोन लेनमध्ये अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग केली जात असल्याचे नेहमीच दिसून येत आहे. ज्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांनाही ही बेकायदा पार्कंग सातत्याने कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. काही गोदामांच्या परिसरात तर गावगुंडांकडून अवैधरित्या रस्त्यांवरच वाहनतळे निर्माण झाली आहेत जी वाहतूक कोंडी आणि अपघातांना कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुळावरच घाव घालण्याच्या दृष्टीकोनातून ही बेकायदा कंटेनर यार्डेच बंद करण्यात यावीत अशी उरण तालुका मराठी पत्रकार संघाची सुरूवाती पासूनची मागणी राहिलेली आहे. त्याकडे तहसिल कार्यालयाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हे आंदोलन केले जाणार आहे.

उरण तालुक्यात सीआरझेड कायद्याची देखील मोठ्या प्रमाणात पायमल्ली करण्यात आलेली आहे. विशेषतः केगाव दांडा समुद्र किनारी भागात तर मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून अनधिकृत भराव आणि बांधकामे करण्यात येत आहेत. राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये याबाबतच्या रकानेच्या रकाने भरून बातम्या देखील छापून आल्या आहेत, मात्र त्यांनतरही महसूल विभागाने या विषयावर देखील कारवाईचा दांडू चालविलेला नाही. त्यामुळे पत्रकार संघाच्यावतीने या विषयावर देखील लेखी स्वरूपात तहसिल कार्यालयाला यापुर्वीच निवेदन दिले आहे. त्याला देखील एका महिन्याचा कालावधी व्हायला आला आहे. मात्र त्यानंतरही कोणतीही हालचाल होतांना दिसत नसल्याने उरण तालुका मराठी पत्रकार संघ या आंदोलनावर ठाम आहे.

उरणच्या बोरी पाखाडी परिसरातील शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय अनधिकृत भंगारवाल्यांनी कब्जा केला आहे. त्या ठिकाणी त्यांनी एका मदरशाचे देखील बेकायदा काम केले आहे. या ठिकाणी काही भाड्याच्या खोल्या निर्माण झाल्या असून त्यामध्ये कोणीही येऊन अवघ्या महिना पंधरा दिवस राहून जात आहेत. अशा लोकांकडून उरण तालुक्यात काही घातपाती कारवाया देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व अनधिकृत भंगारवाल्यांना या ठिकाणावरून हाकलून लावावे अशी देखील पत्रकार संघाची जुनीच मागणी आहे. त्यावरही तहसील कार्यालय आणि नगरपरिषद कार्यालय यांच्या माध्यमातून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळेच या सर्व प्रश्‍नांवर आता जाहीर आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला दिसत नाही म्हणून उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य येत्या 15 ऑगस्ट 2024 रोजी उरण तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार संघाने उरण तहसिलदारांना दिलेल्या लेखी निवेदनातून दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!