शशिकांत मोरे
धाटाव : रोहे तालुक्यातील धाटाव गावच्या नलिनीबाई मोरे यांना आज पहाटे ६ वाजता वृद्धापकाळाने देवाज्ञा आली. निधना समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या निधनाने मोरे कुटुंबीयांसह सबंध पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेसमयी असंख्य समाज बांधव, सगेसोयरे, नातेवाईक, महिलावर्ग यांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
नलिनीबाई दत्तात्रेय मोरे या अतिशय प्रेमळ, सर्वांशी मिळून मिसळून वागणाऱ्या तसेच धार्मिक कार्याची विशेष आवड असणाऱ्या होत्या. त्यांच्या सर्व आप्तस्वकीय, मित्र परिवार यांच्यामध्ये त्या विशेष प्रिय होत्या.आदर्शवत असलेल्या यशवंत ग्रामपंचायत धाटावच्या त्यांनी १५ वर्ष सदस्या म्हणून काम पाहिले. महिला वर्गाचे संघटन करून त्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता. कुटुंबात शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे सर्वांच्याच त्या खुप आवडत्या होत्या. कुटुंबातील सुनांवर त्यांनी मूली सारखे प्रेम केले. पारंपारिक सणसुद कार्यक्रमात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत असत. त्यांच्या पार्थिवावर धाटाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करून त्यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रिया विधी बुधवार, १४ ऑगस्ट तर उत्तर कार्य विधी शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी धाटाव येथील राहत्या निवासस्थानी करण्यात येणार आहेत.