शटर तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह किराणा माल केला लंपास
विश्वास निकम
कोलाड : मुंबई गोवा महामार्गावरील कुंडलिका नदीच्या बाजूला असणाऱ्या दर्ग्यानजिक असणाऱ्या गजानन किराणा दुकानाचे शटर तोडून ८०० रुपयांसह १२ हजार रुपये किंमतीचा किराणा माल चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवार, दि. ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत मुंबई गोवा मार्गावरील कोलाड पोलिस ठाण्याच्या नजिक कुंडलिका नदीकिनारी असणाऱ्या पप्पू जगन्नाथ देशमुख यांच्या गजानन किराणा या दुकानाचे शटर लोखंडी सळईने तोडून दुकानातील ८०० रुपयांची चिल्लर व विलिना कंपनीच्या ६००० रुपये किंमतीचे ५ लिटर तेलाचे ६ कॅन, ३००० रुपये किंमतीचे सिगारेट व इतर वस्तू असे एकूण १२ हजार किंमतीचा माल चोरट्यानी लंपास केला असुन याविषयी पप्पू देशमुख यांनी कोलाड पोलिस ठाण्यात तक्रार केली असुन घटनास्थळी कोलाड ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन मोहिते, पोलीस अंमलदार नरेश पाटील व त्यांचे सहकारी पोलीस यांनी भेट देऊन याबाबत अधिक तपास सुरु केला आहे.
