कर्मचाऱ्यांना धोका, त्वरित लक्ष देण्याची मागणी
अमुलकुमार जैन
अलिबाग : रेवदंडा पोलीस ठाणे नजीक सन १९८७ साली पोलीस कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ झाला. या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये काही वर्षच रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारी वर्गाने राहण्याचा उपभोग घेतला. परंतू कालातरांने या इमारतीच्या स्लॅबमधून पाणी झिरपू लागले. तसेच इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. परिणामी येथे राहणे पोलीस कर्मचाऱ्यांस धोकादायक बनले आहे.
रेवदंडा पोलीस ठाणे येथे चाळीसपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आहेत. परंतू या सर्वांना राहण्यासाठी रेवदंडा परिसरात भरमसाठ भाडे भरून भाडोत्री जागा घ्याव्या लागतात. सध्या ही इमारत अगदीच मोडकळीस आली असून इमारतीला भरपूर ठिकाणी तडे गेल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर इमारतीची दारे-खिडक्या मोडून इतरत्र पडल्या आहेत. तसेच इमारतीच्या भिंतीवर चक्क वृक्षवेली उगवलेल्या दिसून येतात. रेवदंडा पोलीस कर्मचारीवर्गाच्या निवासी सोयीसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीची अवघ्या ३२ वर्षात दूरवस्था झाली असून इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याने कित्येक वर्ष ही इमारत पडीक अवस्थेत आहे. या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये पाण्याची सोय अजिबात नसल्याचे सुध्दा सांगितले जाते.
रेवदंडा पोलीस ठाण्यात पाण्याचीही वानवा
रेवदंडा पोलीस ठाणे येथे एमआयडीसीचे पाणी नसल्याने पोलीस ठाण्यात पाण्याची वानवा असल्याचे दिसते. पोलीस ठाणे येथे शुध्द पाण्याचा अभाव असल्याने दुरवरून पाणी आणावे लागते. त्यामुळे पोलीस कर्मचारीवर्गासह येथे येणाऱ्या सर्वांना पाणी समस्या निश्चितपणे जाणवते. गेले पस्तीस वर्ष रेवदंडा पोलीस ठाणे पाण्यापासून वंचित असल्याचे सांगितले जाते. रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारीवर्ग निवासस्थान व पाणी यांच्या प्रतीक्षेत आहे. रेवदंडा पोलीस कर्मचारी वसाहतीची दूरवस्था झाली आहे.
