• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जेएनपीए रोडवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

ByEditor

Aug 7, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
करळ फाटा ते जेएनपीए या मार्गावर नागरिकांची रहदारी सुरक्षितपणे होण्यासाठी अनेक उड्डाणपुल बांधण्यात आले आहेत, तरीही ट्रेलरच्या बेशिस्त वाहतुकीमुळे उरण परिसरात अपघातांचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही. मग तो दास्तान ते दिघोडे चिरनेर मार्ग असो वा खोपटा ते उरण रस्ता असो, अपघातांचे सातत्य चालूच आहे. आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी जेएनपीए रोडवरील पीयुबी न्हावा शेवा कस्टम ऑफिस नजिकच्या रोडवर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रिक्षा व ट्रेलरचा भीषण अपघात झाला.

सदरच्या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, रात्रपाळी करून भरत ठाकूर, केळवणे, भोम येथील सचीन म्हात्रे आणि आकाश चौगुले हे तिघे रिक्षातून घरी येत असताना पीयुबी येथे आले असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने रिक्षास जोरदार धडक दिली. यामध्ये भरत ठाकूर जागीच मयत झाले, तर सचीन म्हात्रे, आकाश चौगुले यांस गंभीर दुखापत झाली आहे. सदरचा अपघात पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष अनिकेत वसंत तांडेल हे ड्युटीवर जात असताना त्यांनी प्रत्यक्ष पाहीला व त्यांनी त्यांच्या संपर्कातील न्हावा शेवा पोलिस स्टेशनचे पीएसआय दिपक दाभाडे यांना संपर्क साधला असता त्यांनी पोलीस व ॲंब्युलन्स पाठवतो असे सांगितले. यावेळी डीपी वल्डची रुग्णवाहिका येऊन अपघातग्रस्त तिनही व्यक्तींना जेएनपीए हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यावेळी भरत ठाकूर हे मयत झाल्याचे सांगण्यात आले. सचीन म्हात्रे व आकाश चौगुले यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे असे समजते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!