नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहतुक विभागाकडे केली मागणी
वार्ताहर
उरण : एनएमएमटी बस सेवा बंद केल्याने उरणच्या नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रवासाचे मोठे हाल होत असून, ही बस सेवा पूर्ववत चालु करावी, अशी मागणी राष्ट्रवादी इंजिनिअर सेलच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अलिशा वैजनाथ म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहतुक विभागाकडे केली आहे.
खोपटे येथे झालेल्या अपघातानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहतुक विभागाने उरण ते नवी मुंबई दरम्यानची ३१ व ३० क्रमांकाच्या मार्गावरील बससेवा पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही बस सेवा बंद झाल्याने याचा फटका उरणच्या सात हजारपेक्षा अधिक प्रवाशांना बसला आहे. तसेच उरणच्या नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या असता दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमानी आणि विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच प्रवास करून शिक्षण घेणारे विद्यार्थीही या मार्गावर मोठ्या प्रमाणात आहेत. तरी ३१ व ३० क्रमांकाच्या मार्गावरील एनएमएमटी बससेवा सुरू करण्याची मागणी येथील बहुसंख्य रहिवाशी, प्रवाशी वारंवार करीत असुन नमुद मार्गावरील एनएमएमटी बससेवा सुरु करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाशांनी व विद्यार्थींनी केली आहे असे अलिशा म्हात्रे यांनी पत्रात नमुद केले आहे.
त्यामुळे एनएमएमटी बसने दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांनी पर्यायी मार्ग ठरवून आपला प्रवास सुरू केला आहे. यासाठी पर्याय म्हणून लोकल, खाजगी इको वाहनांतुन प्रवास करावा लागत आहे. नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रवासाचे हाल होत असुन ही बस सेवा पुर्ववत चालु करावी व बस चालकांनी मद्यपान करून बस चालवू नये आणि योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती अलिशा म्हात्रे यांनी एनएमएमटी वाहतूक व्यवस्थापक (नवी मुंबई महानगरपालिका) यांच्याकडे केली.
