सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील उंबर्डी येथील जमीन विक्री फसवणूक झाल्याची घटना दि. २९ एप्रिल २०२२ ते ८ जुलै २०२२ दरम्यान माणगाव येथे घडली असून या बाबतची फिर्याद दीपक रामचंद्र गंगावणे (वय ४९, सध्या रा. सायन-मुंबई, मूळ रा. उंबर्डी, ता. माणगाव) यांनी दिली असून कागदपत्रे प्राप्त झाल्यावर माणगाव न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानंतर या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन या प्रकरणी १२ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, या घटनेतील फिर्यादी दीपक रामचंद्र गंगावणे व आरोपी इंदुबाई हरिभाऊ मोरे (रा. कुरण बु. जि. पुणे), सुमन नामदेव सपकाळ (रा. लवासा रोड, जि. पुणे), सखाराम दगडू गायकवाड (रा. कुरण बु. जि.पुणे), शोभा प्रवीण सोनावणे (रा. सिंहगड रोड, जि. पुणे), नंदा प्रकाश कांबळे (रा. सिंहगड रोड, जि. पुणे), कुंदा पप्पू मोरे (रा. सिंहगड रोड, जि. पुणे), नंदा कैलास सपकाळ (रा. सिंहगड रोड, जि. पुणे), सागर नामदेव गायकवाड (रा. कुरण बु., जि.पुणे) हे एकमेकांचे नातेवाईक असून आरोपी दगडू बाबू कोकरे, बाबू दगडू मोरे (दोघे रा.उंबर्डी ता. माणगाव) हे एजंट आहेत. तसेच आरोपी जेकब जोसेफ (वय ४१, रा. घाटकोपर-मुंबई), डेजी स्टायलो चेरवतुर (वय-४६, रा. भांडूप-मुंबई) हे जमीन विकत घेणारे मालक आहेत.
घटनेतील तक्रारदार दीपक रामचंद्र गंगावणे व आरोपी इंदुबाई हरिभाऊ मोरे, सुमन नामदेव सपकाळ, सखाराम दगडू गायकवाड, शोभा प्रवीण सोनावणे, नंदा प्रकाश कांबळे, कुंदा पप्पू मोरे, नंदा कैलास सपकाळ, सागर नामदेव गायकवाड यांची माणगाव तालुक्यातील उंबर्डी गावातील सं. नं. ७२/२/३ अ क्षेत्र २-७७-०० अशी आहे. हि जमीन वरील १२ आरोपींनी संगनमत करून तक्रारदार हे मिळकतीचे सह हिस्सेदार आहेत हे माहित असताना देखील त्यांना डावलून सदर मिळकतीपैकी १-३०-०० हि चुकीच्या पद्धतीने विक्री करून तक्रारदार यांची फसवणूक केली. या गुन्ह्याप्रकरणी आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.१९१/२०२४ भा. द. वि. कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस निरीक्षक श्री. बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. बेलदार हे करीत आहेत.