अब्दुल सोगावकर
सोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देणारे अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी किहीम आदिवासी वाडीवरील गरीब तरुणी व महिलांना शिवणकाम शिकून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा यासाठी जनशिक्षण संस्था सहाण, अलिबाग या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिवणकाम प्रशिक्षण काळात शिवणकाम शिकण्याकरिता लागणाऱ्या सर्व प्रकारचे एक महिन्याचे साहित्य उपलब्ध करून देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. याबद्दल सरपंच पिंट्या गायकवाड यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
जनशिक्षण संस्था अलिबाग यांच्या वतीने किहीम आदिवासी वाडीवरील गरीब तरुणी व महिलांना एक महिन्याचे मोफत शिवणकाम प्रशिक्षण देण्यात येणार होते. हे शिवणकाम प्रशिक्षण घेऊन गरीब आदिवासी महिला स्वतःच्या पायावर उभी राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही प्रमाणात हातभार लावू शकतात, या उद्देशाने सदर प्रशिक्षण देण्यात येणार होते, मात्र या संस्थेतर्फे देण्यात येणारे प्रशिक्षण मोफत असले तरी प्रशिक्षण काळात शिवणकाम शिकण्याकरिता लागणारे एक महिन्याचे साहित्य सदर संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे येथील या गरीब आदिवासी तरुणी व महिलांची मोठी अडचण निर्माण झाली होती.
याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना समजल्यानंतर त्यांनी आदिवासी तरुणी व महिलांना आश्वस्त करत वेळ न दवडता शिवणकाम शिकण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे तब्बल एक महिन्याचे साहित्य नुकतेच आपल्या स्वखर्चाने मोफत उपलब्ध करून देत आपली सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी शिवणकाम साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल गरीब आदिवासी तरुणी व महिलांनी तसेच प्रशिक्षण देणाऱ्या जनशिक्षण संस्था सहाण, अलिबाग यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांचे मनापासून आभार मानले आहेत.