मिलिंद माने
महाड : राज्यातील महायुती सरकारने चालू केलेली महत्त्वकांशी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर घटनेचे राजकारण करून अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडीच्या खेळीला नागरिकांनी बळी पडू नये असे आव्हान विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी महाड येथे केले.
महाडमधील चवदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून भाजपा गटनेते व रायगड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी, बिपिन महामुनकर यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांसमवेत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी लाडकी बहीण योजनेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून बदलापूर घटनेचे राजकारण सुरू केल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते व भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केला. बदलापूरच्या घटनेवरून राज्यात हिंसाचार माजवून अशांतता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र बंदचे आव्हान केले. मात्र न्यायालयाने चपराक दिल्यानंतर महाविकास आघाडीने आजचा बंद मागे घेतला. यावेळी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचाराच्या उद्धव ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने साधा निषेध केला नाही, बदलापूर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. बदलापूर घटनेतील आरोपीला तातडीने अटक ही करण्यात आली आहे. तसेच या घटनेत निष्काळजीपणा दाखविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ देखील करण्यात आले आहे.
बदलापूर येथील प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाचे नियुक्ती करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे. यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. राज्य सरकारने तातडीने हे निर्णय घेतले असताना या घटनेच्या निमित्ताने बंदच्या अडून राज्यात हिंसाचार करण्याची नीच खेळी महाविकास आघाडीकडून केली जात असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या राजवटीत घडलेल्या महिलांवरील अत्याचाराची यादीत वाचून दाखवली. संभाजीनगरमध्ये मेहबूब शेख या सत्ताधारी पक्षाच्या युवा नेत्यानी नोकरी लावण्याचा आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार केला, त्या वेळेला त्याला अटक न करता संरक्षण दिले गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. विदर्भातील हिंगणघाटमध्ये भरदिवसा भर रस्त्यात तरुण प्राध्यापिकाला अंगावर पेट्रोल टाकून जाळले गेले, तेव्हा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होते. डोंबिवलीमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, त्यावेळी देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. अल्पवयीन मुलींवर बलात्कार सामूहिक बलात्कार यासारख्या 11 घटना ऑगस्ट 2020 मध्ये राज्यात घडल्या त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. अशा दुर्दैवी घटनांचे राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने त्यावेळी बंद पुकारला नव्हता, याची आठवण देखील प्रवीण दरेकर यांनी करून दिली.
राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीचे नेते धास्तावले आहेत. काहीही करून लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून होत आहेत. बदलापूर येथे झालेल्या निदर्शना वेळी आंदोलकांकडून लाडकी बहीण योजनेचे पोस्टर दाखविण्यात येत होते. सामान्य नागरिकांकडून असे प्रकार केले जात नाहीत. आंदोलनामध्ये घुसलेल्या राजकीय शक्तींनी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर झळकावले होते, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.