हलगर्जीपणे वाहन चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल
गणेश पवार
कर्जत : दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी गुंडगे येथील सोमजाई इंटरप्राईजेस येथील साईटवरील कामगारांना दैनंदिन वापरासाठी व पिण्याचे पाणी घेऊन येणार्या टॅंकरखाली सापडुन एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली असुन, कर्जत पोलीस ठाण्यात हलगर्जीपणे वाहन चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल आहे.

सदर घटनेबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार राहुल मदन कांबळे यांच्या सोमजाई इंटरप्राईजेस यांच्या सुरू बांधकाम साईटवर कार्यरत कामगारांना दैनंदिन वापरासाठी व पिण्याचे पाणी घेऊन येणारा टॅंकर आला होता. त्यामुळे टॅंकरमधुन पाणी घेऊन सर्व कामगार आपल्या लेबर कॅम्पमध्ये जात होते. त्याचवेळी रामप्यारी मडु सिंह पसाय (वय ६०, मुळ रा. सोडपुर, कोठीसोडपुर, पीधपुर राज्य मध्यप्रदेश सध्या राहणार गुंडगे, ता. कर्जत, जि. रायगड) ही वयोवृद्ध महिला देखील टॅंकरमधुन पाणी घेऊन जात असताना, टॅंकर चालक शाबुददीन मेहबुब शेख (वय २९, रा. दहिवली बामचा मळा ता. कर्जत) ह्याने बेदरकारपणे आपल्या ताब्यातील टॅंकर क्रमांक एमएच ०६ एजी ३२६५ हा जोराने पाठीमागे रिव्हर्स घेतल्यामुळे रामप्यारी मडु सिंह पसाय यांच्या छातीला, डोक्याला व नाका तोंडाला मार लागुन गंभीर दुखापत होऊन त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना त्यांचा मुलगा जितेंद्र मडु सिंह पसाया यांनी व त्यांच्या सहकार्यांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे दाखल केले असता, तेथील डाॅक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषित केले.
सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाण्यात टॅंकर चालक शाबुददीन मेहबुब शेख याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (ए), १२५ (बी), मोका कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर घटनेचा तपास हा कर्जत पोलिस उप विभागीय अधिकारी डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बाबू शंकरराव धबडे, पोलीस हवालदार अनिल वडते, सहाय्यक फौजदार संजय जगताप, पोलीस शिपाई गणेश पाटील हे करीत आहेत.