विनायक पाटील
पेण : अखिल रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघाची सभा अभिमन्यू गावंड उरण तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आगरी समाज विकास मंच पेण येथे संपन्न झाली.
या कार्यक्रमासाठी पाहुणे डॉ. मनिष वनगे, डॉ. शुभम शंकर ठाकूर, विलास सुखदेव शिंदे (क्षेत्रिय अधिकारी स्टेटबँक रायगड), श्लोक कुमार सिंह (मुख्य प्रबंधक स्टेटबँक पेण), डी. पी. म्हात्रे (निवृत्त जिल्हा न्यायाधिश), शैलेश पाटील (उपाध्यक्ष, कोकण विभाग कामगार आघाडी), रविकांत ठाकूर (पेण तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटना), पत्रकार धनाजी घरत, सुहास चिंतामण पाटील (समाजसेवक), गटशिक्षणाधिकारी अरूणादेवी मोरे आदि मान्यवरांसह जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मागील सभेचा अहवाल वाचन करून पेण तालुका अध्यक्ष रविकांत ठाकूर यांनी प्रास्ताविकातून वर्षभरापासून केलेल्या कामाची माहिती दिली. मान्यवरांच्या उपस्थितीत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख यांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा अध्यक्ष अमरचंद पाटील यांनी सांगितले की, शिक्षकांच्या गटविमा फंड रक्कम तसेच निवड श्रेणी प्रलंबित असून जिल्हा परिषद येथे प्रस्ताव पडून राहतात. चार वर्षांपूर्वी पाठवलेले गट विम्याचे २०० प्रस्ताव मुद्दाम काहीतरी त्रुटी काढून परत पाठवले याबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकारी वर्ग चालढकलपणा जास्त करत असल्याचे सांगितले. तर निवृत्त न्यायाधीश डी. पी. म्हात्रे यांनी शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करत सेवानिवृत्त शिक्षक बांधवांना न्याय मिळण्यासाठी मी स्वतः पुढे येऊन प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहून काम करणार एवढेच काय तर वेळप्रसंगी अधिकारी वर्गाला धडा शिकवण्यासाठी मी तुमच्या बरोबर कायम असल्याचे सांगितले.
कामगार आघाडीचे शैलेश पाटील यांनी सांगितले की, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी राज्यस्तरीय व केंद्र स्तरावर आपण आवाज उठवून एक दोन महिन्यांत सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात अभिमान्यू गावंड यांनी सांगितले की, जिल्हा कार्यकारणी व सर्व तालुका पदाधिकारी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न धसास लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात तसेच यापुढे कोणालाही फेऱ्या माराव्या लागणार नसुन लवकरात लवकर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना काम करणार असे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरचंद पाटील (रायगड जिल्हा अध्यक्ष), प. जा. म्हात्रे (रायगड जिल्हा कार्याध्यक्ष), रविकांत ठाकूर (पेण तालुका अध्यक्ष व राज्य प्रतिनिधी), अविनाश म्हात्रे (राज्य प्रतिनिधी रायगड), प्र. शं. म्हात्रे (जिल्हा सल्लागार), कृ. ना. मोकल (अध्यक्ष, नगरपलिका खोपोली), गजानन गायकवाड (जिल्हा उपाध्यक्ष), गुरुनाथ पाटील (रायगड जिल्हा सरचिटणीस), शुभदा दातार (दक्षिण विभाग प्रमुख), उज्वला निकम (महिला प्रतिनिधी), अभिमन्यू गावंड (उरण तालुका अध्यक्ष), स. रा. म्हात्रे (जिल्हा उपाध्यक्ष), नरेश पाटील (अध्यक्ष पनवेल), सुगंधा म्हात्रे (पेण तालुका महिला प्रतिनिधी), इंदिरा रविकांत ठाकूर, अंजली सुहास पाटील आदींनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश थवई यांनी केले.