अनंत नारंगीकर
उरण : बदलापूर शहरातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मविआच्या नेत्यांनी शनिवारी (दि. २४) उरण शहरातील गांधी चौकात तोंडावर काळ्या फिती लावून व हातात काळा झेंडा घेऊन शांततेच्या मार्गाने निषेध आंदोलन सुरू केले. यावेळी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला होता.
सध्या राज्यात बलात्कार, महिलांची छेडछाड या घटनेत वाढ झाली आहे. अशा घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच बदलापूर शहरातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. त्या घटनेचा निषेध व्यक्त करणाऱ्यासाठी व रेल्वे स्थानक परिसरातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शनिवारी (दि. २४) मविआच्या नेत्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. मात्र, न्यायालयाने सदर महाराष्ट्र बंद आंदोलन बेकायदा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मविआच्या वरिष्ठ नेत्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत शांततेच्या मार्गाने एका ठिकाणी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
उरण तालुक्यातील मविआच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाचे पालन करत बदलापूर प्रकरणी शनिवारी (दि. २४) शांततेच्या मार्गाने उरण शहरातील गांधी चौकात आपल्या तोंडावर काळ्या फिती लावून व हातात काळे झेंडे घेऊन शांततेच्या मार्गाने आंदोलन सकाळी ठिक ११-३० च्या सुमारास सुरू केले. या निषेध आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शेकापचे युवा नेते प्रितम म्हात्रे, उप जिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, निरंतन कदम, कामगार नेते भुषण पाटील, महिला नेत्या सिमाताई घरत, शेकापचे रमाकांत म्हात्रे, माजी सभापती नरेश घरत, काँग्रेस पक्षाचे बबन काबळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोज भगत, नाना नलावडे यांच्यासह मविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी पोलीस फाटा तैनात केला होता.