विनायक पाटील
पेण : बदलापूर येथे घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण राज्यभरातील शिवसेना (उध्दव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर बंद बेकायदेशीर आसल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक ठिकाणी सदर घटनेचा फक्त निषेध व्यक्त करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर आज पेणमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून पेण पालिकेच्या नाक्यासमोर काळ्या फिती, काळे कपडे आणि काळे मास्क लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करून रस्त्यावर फक्त निषेध व्यक्त करण्यासाठी उतरलो असुन ज्याप्रमाणे न्यायालयाने महाराष्ट्र बंद हे बेकायदेशीर असल्याचा निर्णय देण्यात तत्परता दाखवली त्याप्रमाणे ज्या मुलींचे शोषण झाले आहे, ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत अशा घटनेतील नराधमांना कठोर शिक्षा देण्याच्या आदेशाची तत्परता दाखवावी असे सांगितले. तर काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की, जर या सरकारला राज्यात होणारे अत्याचार रोखता येत नसतील तर त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, याशिवाय गृहमंत्र्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, महीला अत्याचार निषेध मंच आम्हाला द्यावा अशी मागणी आम्ही करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर,शेकापच्या स्मिता पाटील, काँग्रेस शहरप्रमुख प्रवीण पाटील, शिवसेना ज्येष्ठ नेते जीवन पाटील, योगेश पाटील, हिराजी चोगले, मोहिनी गोरे, लहू पाटील, राजेंद्र म्हात्रे, चंद्रहास म्हात्रे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.