विश्वास निकम
कोलाड : भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली व डॉ. बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठ दापोली यांची शास्त्रीय सल्लागार समितीची सभा दापोली येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी डॉ. संजय भावे कुलगुरू, डॉ. पराग हळदणकर विस्तार शिक्षण संचालक, डॉ. एस. के. रॉय संचालक आटारी पुणे, डॉ. शाकीर अली प्रमुख शास्त्रज्ञ पुणे, डॉ. सतिश नारखेडे डायरेक्टर, श्री. कुलकर्णी लीड बँक रायगड, महेश केलकर नाबार्ड अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सभा आयोजित करण्यात आली.

यावेळी रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पालघर या जिल्ह्यातील शास्त्रीय सल्लागार समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रायगडमधून शरद गोळे (सुधागड), श्रीधर जंजिरकर (मुरुड), बाळाराम दळवी (माणगाव), रुपाली देवकर (रोहा) यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. यामध्ये सुधागड तालुक्यातील शरद गोळे यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग करून शेतीसह भुईमूग, हळद यावर विशेष जागृती करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. शेती पूरक व्यवसायावर अधिक भर देऊन तालुक्यात कृषिपर्यटन, शेतीपालन, कुळशेती, भाजीपाला लागवड यामध्ये शेतकरी व महिला बचत गट तयार केले. शेती उत्पादन विक्रीच्या बाबतीत जनजागृतीचे काम सुरु आहे. सदर सभा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाली.