घन:श्याम कडू
उरण : कोणत्याही शासकीय कार्यालयामसोर खासगी वाहने उभी करू नयेत, असा नियम आहे. मात्र, या नियमाची सर्रास पायमल्ली होत आहे. जे कार्यालय शिस्तीसाठी ओळखले जाते त्याच तहसील व पोलिस ठाण्यासमोर सर्रास अनधिकृत पार्किंग होत आहे. ही पार्किंग दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलीस शाखा यांच्याबरोबर गेली अनेक वर्षे बैठका होऊन तीन ते चार जबाबदार अधिकारी बदलूनही यावर ठोस असा मार्ग काढण्यात अपयश येताना दिसत आहे.

शहरात अरुंद रस्ते, पार्किंगची व्यवस्था नसणे, अस्ताव्यस्त वाहने उभी राहणे ही समस्या नेहमीचीच झाली आहे. शहरात नगरपालिकेने स्वतःची पार्किंगची व्यवस्थाही केलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हा प्रश्न शहरातील अत्यंत रहदारीचे मार्केट म्हणून ओळखले जाणारे उरण चारफाटा, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका, गणपती चौक, आपला बाजार वाहतूक कोंडीची परिस्थिती बिकट आहे. शहरात कोठेही पार्किंगसाठी जागा नाही. आहे ती जागा अपूर्ण आहे आणि तेथेही हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण सर्वाधिक आहे. त्यामुळे तेथे वाहने लावताना वाहनधारकांना अनेक अडचणी येतात. पर्यायाने वाहने रस्त्यावर उभी करण्याशिवाय पर्याय नाही.” यातील काही हातगाड्या या माजी नगरसेवक व नगरपालिका कर्मचारी यांच्या असल्याचे समजते.
अनेक वाहने बेकायदेशीर नगरपालिका कार्यालय, बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, तहसील व पोलिस ठाण्याच्या परिसरात वाहने उभी करण्यात येतात. येणारा प्रत्येक जण याच ठिकाणी आपले वाहन पार्क करतात. आदी ठिकाणी शेकडो वाहनांची गर्दी असते. वाहनांची संख्या वाढताच ती वाहने थेट रस्त्याच्या मध्यभागापर्यंत येतात. वाहतूक कोंडी संदर्भात अनेकवेळा नगरपालिका प्रशासन, वाहतूक पोलीस शाखा यांच्याबरोबर गेली अनेक वर्षांपासून अनेक बैठका झाल्या आहेत. सर्व कृती कागदावर प्रत्यक्षात प्रगती काहीच नसल्याचे चित्र पहावयास मिळते. आजपर्यंत उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी व वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी यांच्याबरोबर बैठक झालेले आजतागायत तीन ते चार अधिकारी येथून बदलून गेले आहेत. येणारा नवीन अधिकारी लवकरच यावर मार्ग काढू असे सांगून वेळ मारून नेत उरणकरांची एक प्रकारे फसवणूक करीत आले आहेत. यावरून येथील जबाबदार अधिकारी वर्गाला याचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उरणच्या जनतेकडून व्यक्त होत आहेत.