• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उत्कृष्ट ग्राहक सेवेमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी महिलांची रायगड जिल्हा सहकारी बँकेला पसंती

ByEditor

Aug 31, 2024

अमुलकुमार जैन
रायगड :
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आलेली असून शासनाच्यावतीने ३१ ऑगस्ट २०२४ अखेर ४५२६३ इतक्या महिलांचे तब्बल १३.५० कोटीपेक्षा अधिक रक्कम रायगड जिल्हा बँकेत जमा झालेली आहे. रायगड जिल्हा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात असलेल्या शाखांचे जाळे, सोबतीला सर्व खात्यांचे केलेले आधार सीडिंग, महिला बचतगट क्षेत्रामधील दर्जेदार काम आणि विशेषतः उत्कृष्ट ग्राहकसेवा यामुळे जिल्ह्यातील हजारो महिलांनी रायगड जिल्हा बँकेच्या खात्यांना अधिक प्राधान्य देवून लाडकी बहीण योजनेकरिता जिल्हा सहकारी बँकेची निवड केलेली पाहायाला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेची एकूण १ लाख पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांची एकत्रित ३० कोटीपेक्षा अधिक रक्कम रायगड जिल्हा सहकारी बँकेमध्ये जमा होण्याचा अंदाज बँकेने व्यक्त केला आहे.

शासनाच्यावतीने रायगड जिल्ह्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांचा निधी थेट बँक खात्यात जमा केला जात आहे. योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडले असल्यास निधी जमा होत आहे. बँकेने महिलांच्या आधार कार्डाशी संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान केली आहे. यामुळे बहुतांश महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे वेळेत मिळाले आहेत. तसेच महिलांच्या खात्यात निधी वेळेत हस्तांतरित करण्याचे काम बँकेने केल्यामुळे अधिकाधिक महिला ग्राहकांनी बँकेला पसंती दर्शविल्याबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिला ग्राहकांचे आभार व्यक्त केले आहेत.

तसेच याबाबत अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी ग्राहकांना आवाहन करताना सांगितले की, ज्या महिलांच्या बँक खात्यात अद्याप निधी जमा झालेला नाही, त्यांनी बँकेत जाऊन आपले आधार लिंक खाते तपासावे. तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करण्यासाठी बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. याकरिता जिल्ह्यातील सर्व शाखांना सूचना देण्यात आलेल्या असून शासनाची योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही सांगितले. तसेच ही योजना सुरू होत असताना बँकेने सर्व महिलांना झीरो बॅलन्सने खाते सुरू करण्याचे आवाहन केले होते. त्यामध्ये देखील महिला ग्राहकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल आणि जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे प्रतीनिधी, पत्रकार यांनी देखील याचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!