मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आज पासून राज्यव्यापी संप आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तराईवरील 13 संघटनेची कृती समितीनं संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊन देखील कोणताही तोडगा निघाला नसल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आजपासून (3 सप्टेंबरपासून) एसटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक दिल्याने महामंडळाकडून नियोजन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी जादा बसेस पाठविण्यात येणार असल्याने धरणे आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना देखील महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. बसस्थानकावर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा यासंदर्भात सूचना देखील करण्यात आल्या आहेत. आंदोलनावेळी बसस्थानकात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे. आंदोलनामुळे फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयाला देण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
काय आहेत मागण्या?
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन
- 2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ
- 58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी
- 57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी
कोणते आगार चालू कोणते बंद?
11 कामगार संघटनाच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे (ST Bus Employees On Strike)आज 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारापैकी 35 आगार पुर्णतः बंद आहेत. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू आहेत. मुंबई विभागात सर्व आगारातील वाहतूक सुरळीत चालू आहे. त्याचबरोबर, ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद आहेत. विदर्भातील सर्व आगारातील वाहतूक सुरू आहे. तेथे बंदचा इतका प्रभाव दिसून येत नाही. मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक आगार बंद आहेत. ही माहिती अधिकृत माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
कोकणात देखील एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अनेक भागात प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसतायत. सकाळपासून बस डेपोमधून गाड्या न सुटल्यामुळे विद्यार्थ्यांचेही हाल होताना दिसतायत. गुहागर, दापोली, खेड डेपोमध्ये शंभर टक्के बंद असल्याचे पाहायला मिळतंय तर चिपळूणमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, पेण, श्रीवर्धन, महाड, माणगाव आगारात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत.
खानदेशात नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव ,पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. बाकीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू आहे. नागपूर मधून रोज 1200 फेऱ्या होतात त्या सर्व बंद आहे. सिडको पैठण, वैजापूर कन्नड स्थानकातून बस धावल्या नाहीत. मुख्य बस स्थानक, सोयगाव सिल्लोड गंगापूर अंशतः सुरू आहे.
