• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महायुतीचा फाॅर्म्युला ठरला! भाजपला 160 तर अजितदादा, एकनाथ शिंदेंना फक्त 64 जागा?

ByEditor

Sep 9, 2024

मुंबई : अमित शाह हे रविवारी (ता.8) मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. अमित शहांच्या या दौऱ्यात भाजप पदाधिकारी, नेत्यांनी विधानसभेला भाजपने 160 जागा लढल्या पाहिजेत, अशी मागणी केली. 288 मतदारसंघापैकी भाजप 160 जागांवर लढली तर अवघ्या 128 जागा शिल्लक राहतात. त्यामुळे अजित पवार गट 64 आणि शिवसेने शिंदे गट 64 जागांवर लढावे लागू शकते.

अमित शाह यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत 125 जागा भाजपने जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे. तर, 75 जागांची जबाबदारी भाजप नेत्यांना वाटून देण्यात आली आहे. भाजपला 125 जागांवर विजय मिळवण्यासाठी 150 पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढावी लागणार आहे. त्यामुळे भाजप 160 जागांवर लढणार या चर्चांना राजकीय वर्तुळात जोर आला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी अमित शाह यांच्याकडे 160 जागा लढण्याची मागणी केली त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे देखील तेथे उपस्थित होते. मात्र, ही भाजपची अधिकृत बैठक नव्हती. अनौपचारिक गप्पांमध्ये ही मागणी करण्यात आली होती. त्यामुळे यावर शिंदे गटाकडून अजुनपर्यंत कोणीच काही बोलले नाही.

शिंदे गटाचा 120 जागांवर दावा

भाजपकडून 160 जागांवर दावा करण्याआधीच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे गट 120 जागांवर लढणार असल्याचा दावा केला होता. तर, अजित पवार गटाकडून देखील 80 पेक्षा अधिक जागांवर दावा करण्यात येतो आहे.

महायुतीची बैठक

मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शाह यांच्या दौऱ्यात अजित पवार दिसले नाही. मात्र, दिल्लीला परत जाताना अमित शाह यांनी विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला अजित पवार उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या रणनितीवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!