४२ पुठ्ठे २२ दिवसांची मेहनत, कर्जतमधील बाप्पाची आरास ठरतेय आकर्षक, गणेशभक्तांकडून कौतुक
गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील आंत्रड नीड या गावातील पंढरीनाथ करडे यांच्याकडे गणेशोत्सवासाठी आकर्षक आरास केली जाते. गेली अनेक वर्षे आकर्षक आरास करताना ती पर्यावरणपूरक असली पाहिजे हा त्यांचा कटाक्ष राहिला आहे. यंदा समस्त हिंदूंचे पूजनीय श्रीराम मंदिरात विराजमान झाले आहेत. त्यामुळे श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारायची असा करडे यांनी निर्धार केला आणि तब्बल २२ दिवसांत ४२ पुठ्ठ्यांपासून राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी साकारली आहे. या प्रतिकृतीचे परिसरात कौतुक होत असून गणेशभक्तांमध्ये ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्र्रातच नाही तर सातासमुद्रापार देखील साजरा केला जातो. तोही जल्लोषात आणि उत्साहात! गणेशोत्सवात बाप्पा घरी येणार म्हणून आपल्या लाडक्या बाप्पासाठी सुंदर आरास केली जाते. हि सजावट करताना पूर्वी पर्यावरणाला घातक अशा थर्माकॉलचा वापर होऊ लागला त्यामुळे शासनाने थर्माकॉलवर बंदी जाहीर केली होती. तर पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य मिळावे यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन देखील होऊ लागले. असे असले तरी कर्जत तालुक्यात आंत्रड नीड गावात राहत असलेले पंढरीनाथ सदानंद करडे यांच्या घरी येणाऱ्या बाप्पासाठी पर्यावरणपूरक सजावट करण्याची परंपरा आजही टिकवली जात आहे. बाप्पाच्या सजावटीला त्यांच्याकडून विविध प्रतिकृतींची सजावट केली जाते. यंदा श्रीराम मंदिराचे निर्माण होऊन त्यात रामलल्लाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे. समस्त रामभक्तांसाठी हि श्रद्धेची बाजू असल्याने करडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निश्चय केला. यासाठी पंढरीनाथ करडे, चेतन दत्तात्रेय विरले, विश्वास करडे, प्रेम भरत विरले, अमित राजेंद्र विरले हे ऑगस्ट महिन्यात कामाला लागले. पण मुद्दा होता कि प्रतिकृती हुबेहूब साकारणार कशी? कारण कुणीच राममंदिर पाहिलं नव्हतं. त्यात इंटरनेटवर सुरवातीला बारकावे मिळतील असे छायाचित्र उपलब्ध नव्हते. मात्र अशातच त्यांना राममंदिराच्या निमंत्रणाचे छायाचित्र मिळाले. आणि सजावटीच्या कामाचा श्रीगणेशा झाला. सर्वानी अपार मेहनत घेऊन तब्बल ४२ पुठ्ठे आणि गोंद वापरत २२ दिवसात हि प्रतिकृती पूर्ण केली. त्याला साजेशी रंगछटा देत त्यात लाईट्सचा वापर करण्यात आला. तर मंदिराच्या बाजूला गणेशमूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
गणेशासाठी सजावट करताना आम्ही कायम पर्यावरणाचा विचार करून सजावट करतो असे सांगतानाच सजावट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त भेट देत असल्याची माहिती पंढरीनाथ करडे यांनी दिली आहे.
