जिल्हाधिकारी यांचा निर्णय, ग्रामपंचायत अधिनियम १४ ज (३) नुसार कारवाई
गणेश पवार
कर्जत : तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विजय रामचंद्र हजारे यांच्या भावाने अनधिकृत बांधकाम केल्याने त्याविरोधात सोमनाथ गणपत विरले यांनी आवाज उठवत शासन दरबारी रीतसर तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीची दखल घेत रायगड जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३ चे कलम १४ ज (३) नुसार ग्रामपंचायत विवाद अर्ज ४२/२०२१ प्रमाणे अर्जदार यांनी केलेल्या दाखल अर्जानुसार कोल्हारे ग्रामपंचायतीचे सदस्य विजय रामचंद्र हजारे यांचे सदस्य पद रद्द बातल केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत ही नेरळ विकास प्राधिकरण संकुल अंतर्गत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले विद्यमान सदस्य विजय रामचंद हजारे यांचे बंधू श्रीकांत रामचंद्र हजारे यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ धामोते एसटी स्टँडलगत असलेल्या सार्वजनिक नाल्यावर भराव व भिंत बांधून पत्र्याची शेड बांधून मालमत्ता क्र. ३२६६ नोंद प्रमाणे काम केले आहे. शासन निर्णयाप्रमाणे निवडून आलेल्या सदस्याच्या कुटुंबातील सदस्यांनी जर बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम केले तर त्याचे सदस्य पद रद्द होते. याच नियमावर बोट ठेवत तथा या कायद्याचा आधार घेत धामोते गावातील रहिवासी सोमनाथ गणपत विरले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.
त्यानुसार सदस्य विजय रामचंद हजारे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३ चे कलम १४ ज (३) नुसार अपात्र ठरविण्यासंदर्भात रायगड जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात दाखल अर्जानुसार दाखल करण्यात आलेल्या ग्रामपंचायत विवाद अर्ज ४२/२०२१ नुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या न्यायालयाकडून दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे यांना अपात्र ठरविल्याचा निकाल देण्यात आला आहे. तसेच त्या संदर्भातील निकालाची प्रत पुढील कारवाईकरीता कर्जत तहसिलदार व पंचायत समिती कर्जत यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. या निर्णयाबाबत कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांना त्यांच्या भूमिकेसंदर्भात विचारणा केली असता, ते या निर्णया विरोधात विभागीय आयुक्त कोकण यांच्या न्यायालयात अपिल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मी कोल्हारे ग्रामपंचायतीच्या सन २०२१ च्या निवडणूकीत प्रभाग क्र. १ मधून सदस्य म्हणून निवडून आलो आहे. माझा भाऊ हा आमच्या कुटुंबापासून गेली २० वर्षापासुन वेगळा राहात असुन, त्याची घरपट्टी तसेच रेशनकार्डही वेगळे आहे. भाऊ श्रीकांत हजारे यांनी नेरळ पूर्व भागातील गावठाण जागेत दुकान गाळा बांधलेल्या बांधकावर त्याचे स्वतःचे नावे कर आकरणी केलेल्या अर्जानुसार नेरळ ग्रामपंचायतीच्या दि. ३०/०९/२०१५ मासिक सभेच्या ठराव ९२ नुसार घरपट्टी लावल्याचे व पारित ठरावात अतिक्रमण असा उल्लेख नाही. तसेच गावठाण जागेत असल्याचा उल्लेख आहे. मी पंचायत समिती कर्जत, गटविकास अधिकारी यांचे कार्यालयाकडे या प्रकरणी माझे लेखी म्हणणे व सोबत कागदपत्रे दिली असताना व तसा अहवाल गटविकास अधिकारी यांनी पाठवला असताना, त्या संदर्भात विचार न करता जो रायगड जिल्हाधिकारी साहेब यांनी माझ्या विरोधात निर्णय दिला आहे तो मला मान्य नसल्याने माझ्या न्याय हक्कासाठी त्या निर्णयाविरोधात विभागीय आयुक्त कोकण यांच्या न्यायालयात अपिल दाखल करणार आहे.
-विजय हजारे
कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य
