• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाविकास आघाडीत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा नाही?

ByEditor

Sep 24, 2024

मिलिंद माने
मुंबई :
सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 जागांपैकी एकही जागा काँग्रेसला मिळण्याची सुतराम शक्यता नसल्याने महाविकास आघाडीमध्ये कोकणात काँग्रेसने फक्त राष्ट्रवादी व शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन भाषणे करण्यापलीकडे दुसरे कोकणातील काँग्रेसच्या नेत्यांना कोणतेही काम शिल्लक राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सन २०२४ची विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार आहे, त्याबाबत राज्यातील महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष यांची राज्यात महाविकास आघाडी आहे. मात्र कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही आमदार काँग्रेसचा विधानसभेत अथवा विधानपरिषदेत नसल्यामुळे कोकणातील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेतृत्व जवळपास संपुष्टात आले आहे. त्यातच ज्याचे आमदार विद्यमान परिस्थितीमध्ये आहेत परंतु त्यांनी पक्ष बदल केला असला तरी त्या जागांवर तोच पक्ष निवडणूक लढवेल अशी रणनीती महाविकास आघाडीमध्ये ठरली आहे. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटाची शिवसेना यांचे निवडून येण्याच्या जागा कोकणातील तीन जिल्ह्यात निवडून येण्याची सद्यस्थिती कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे.

रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघांपैकी उरण, पनवेल व पेण या विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे आमदार आहेत तर कर्जत, अलिबाग व महाड या तीन मतदारसंघावर शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. परंतु हे तिन्ही आमदार जरी शिंदे गटाकडे गेले असले तरी या जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार आहे. त्याला अपवाद अलिबाग विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शेतकरी कामगार पक्षाला सोडणार आहे, त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र प्रवीण ठाकूर यांनी जरी काँग्रेस नेतृत्वाकडे या जागेची मागणी केली असली तरी ही जागा मूळ शिवसेना पक्षाची असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ती शेकापक्षाला सोडल्याने या जागेवर देखील काँग्रेसने दावा करून काहीही उपयोग होणार नसल्याचे बोलले जात आहे. तर श्रीवर्धनची एकमेव जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, मात्र या जागेवरील विद्यमान आमदार व राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या जरी अजित पवार गटात गेल्या असल्या तरी या जागेवर शरदचंद्र पवार गट उमेदवार देणार आहे.

श्रीवर्धन विधानसभेचा उमेदवार आयात व कुणबी समाजाचा असणार?

श्रीवर्धन विधानसभेची जागा ही सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील खासदार सुनील दत्तात्रय तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार गटात गेल्याने ही जागा पुन्हा एकदा शरदचंद्र पवार गट लढवण्यासाठी तयार आहे. मात्र शरदचंद्र पवार गटाकडे तटकरेंच्या तोडीस तोड उमेदवार नसल्याने या विधानसभा मतदारसंघात कुणबी समाजाची ताकद पाहता या मतदारसंघातील उमेदवार हा दुसऱ्या पक्षाकडून आयात केलेला व कुणबी समाजाचा तसेच याच विधानसभा मतदारसंघातील आहे. मात्र तो उमेदवार एका पक्षाचा पदाधिकारी असल्याने त्या पक्षाच्या पक्षप्रमुखांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर तो पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार असेल असे संकेत सध्या प्राप्त होत आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार व राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी मुलीच्या विजयासाठी त्यांना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात बसस्थान मांडावे लागणार हे मात्र नक्की. मात्र शरदचंद्र पवार हे सुनील तटकरे यांना मात्र श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात गद्दारीचा धडा देणार असल्याचे देखील बोलले जात आहे. शरदचंद्र पवार यांची रणनीती काय असेल? हे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारावरून स्पष्ट होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेचे ५ मतदारसंघ आहेत. त्यातील दापोली, गुहागर, रत्नागिरी व राजापूर या मतदारसंघावर शिवसेना पक्षाचे उमेदवार निवडून आले होते. मात्र शिवसेना पक्ष फुटीनंतर दापोली मतदारसंघातील आमदार योगेश कदम व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गुहागर व राजापूर या दोनच मतदार संघातील आमदार आहेत. तर चिपळूण मतदार संघातील आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघावर देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट प्रशांत यादव या मराठा समाजातील नवोदित तरुणाला उमेदवारी देण्याचे संकेत शरदचंद्र पवार गटाकडून प्राप्त होत असून कोकणात देखील यानिमित्ताने शरदचंद्र पवार यांनी मराठा कार्ड खेळले असल्याने चिपळूण विधानसभेची जागा देखील शरद पवार त्यांच्या कौशल्यावर काबीज करणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात देखील काँग्रेस पक्षाला एकही जागा विधानसभेची प्राप्त होऊ शकणार नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील कुडाळ व सावंतवाडी या दोन मतदारसंघात शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे गटाकडे एकच आमदार आहे. तर कणकवलीची जागा निलेश नारायण राणे हे भाजपाचे आमदार असल्याने भाजपाकडे आहे. त्यामुळे याही जिल्ह्यात काँग्रेसचा एकही विद्यमान आमदार नाही. परिणामी या तिन्ही मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच आमदार विधानसभा निवडणूक लढणार आहेत.

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदार संघाची नावे व व उमेदवार सद्यस्थितीत पक्षाकडे आहेत त्याची माहिती पुढीलप्रमाणे :

रायगड जिल्हा

१८८ पनवेल विधानसभा मतदारसंघ
प्रशांत रामशेठ ठाकूर (भाजपा)

१८९ कर्जत विधानसभा मतदारसंघ
महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना पक्ष, परंतु सध्या शिंदे गटाकडे)

१९० उरण विधानसभा मतदारसंघ
महेश बालदी (अपक्ष+परंतु भाजपा पुरस्कृत)

१९१ पेण विधानसभा मतदारसंघ
रवींद्र दगडू पाटील (भाजपा पक्ष)

१९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ
आदिती सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परंतु सध्या अजित पवार गट)

१९४ महाड विधानसभा मतदारसंघ
भरत मारुती गोगावले (शिवसेना पक्ष परंतु सध्या शिंदे गट)

रत्नागिरी जिल्हा

२६३ दापोली विधानसभा मतदारसंघ
योगेश रामदास कदम (शिवसेना पक्ष परंतु सध्या शिंदे गट)

२६४ गुहागर विधानसभा मतदारसंघ
भास्कर भाऊराव जाधव शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

२६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघ
शेखर गोविंदराव निकम (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट)

२६६ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
उदय रवींद्र सामंत (शिवसेना शिंदे गट)

२६७ राजापूर विधानसभा मतदारसंघ
राजन प्रभाकर साळवी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

सिंधुदुर्ग जिल्हा
२६८ कणकवली विधानसभा मतदारसंघ
निलेश नारायण राणे (भाजपा पक्ष)

२६९ कुडाळ विधानसभा मतदारसंघ
वैभव विजय नाईक शिवसेना पक्ष (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

२७० सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ
दीपक वसंतराव केसरकर (शिवसेना पक्ष परंतु सध्या शिंदे गट)

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा आहेत. मात्र यापैकी एकाही जागेवर २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला नव्हता. तेव्हापासूनच काँग्रेसचे अस्तित्व कोकणातून कमी होण्यास सुरुवात झाली होती. याची कल्पना काँग्रेस पक्षाच्या दिल्ली नेतृत्वाला नसल्याने त्यांनी मागच्या पाच वर्षात विधानपरिषद असो अथवा राज्यसभा असो एकही उमेदवार कोकणातून न दिल्यामुळे कोकणातील उरलीसुरली काँग्रेस एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेली अथवा काहींनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाणे पसंत केले. जे काही आहेत ते स्वस्थ बसून आहेत, कारण पक्षाची ताकद नसल्याने व कोकणातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्याने एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व असणारे कोकण काँग्रेस नेतृत्वाच्या ढिशाळ कारभारामुळे आता पुरते घायाळ झाले आहे.

त्यातच कोकण पदवीधर मतदार संघाची जागा शिवसेना लढणार होती, मात्र काँग्रेसने ऐन वेळेस अट्टाहास केला व ती जागा शिवसेनेला सोडावी लागली. मात्र या जागेवर देखील काँग्रेस समाधानकारक मतदान प्राप्त करू शकली नाही. परिणामी काँग्रेसचे अस्तित्व कोकणामधून संपत चालल्याचे हे संकेत होते. त्यामुळे कोकणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कोणत्या मुद्द्यावर जागा सोडणे हा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे व शरदचंद्र पवार गटाकडे असल्याने काँग्रेसचे कोकणातील नेतृत्व देखील आता थंड पडल्याचे चित्र या निमित्ताने स्पष्ट होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!