• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मालवणातील शिवरायांचा पुतळा नेमका कशानं कोसळला? चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती

ByEditor

Sep 26, 2024

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर अवघ्या ८ महिन्यात कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. शिवप्रेमी व विरोधकांनी सरकारला घेरल्यानंतर याप्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली होती. या चौकशी समितीने पुतळ्याबाबत आपला १६ पानी अहवाल सरकारकडे सादर केला आहे. या अहवालात पुतळा कशामुळं कोसळला याची धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे.

लोखंडाला चढलेला गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा कोसळल्याचे या अहवालामध्य नमूद करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची पोलीस चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीसह महायुतीमधील नेत्यांनी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर जाऊन पुतळ्याची पाहणी केली होती. आदित्य ठाकरेंच्या पाहणी दौऱ्यात राणे समर्थक आणि ठाकरे गट आमनेसामने आल्यामुळे राडा झाला होता.

डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात म्हणजे २६ ऑगस्ट २०२४ रोजीपुतळाकोसळला होता.पुतळा कोसळ्यानंतर इंजिनिअरला अटक केली. मात्रया पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. यालाही पोलिसांनी कल्याणमधून अटक केली. आता या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने आपला १६ पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना, त्याचे डिझाइन चुकीचे होते.

भारतीय नौदलाचे कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती सरकारने चौकशीसाठी स्थापन केली होती. यासमितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता.

पुतळा कशामुळे कोसळला?
समितीच्या अहवालात पुतळा उभारणीत झालेल्या अनेक चुकासमोर आणल्या आहेत. त्याचबरोबर पुतळा कोसळण्याची कारणेही विशद करण्यात आली आहेत. लोखंडी रॉडला चढलेला गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असे अहवालात म्हटले आहे. तसेच समितीने म्हटले आहे की, पुतळा उभारणीनंतर देखभालही योग्य पद्धतीने झाली नाही, त्यामुळे कमी काळातच पुतळ्याला गंज चढला होता. त्याचबरोबर वेल्डिंग चुकीच्या पद्धतीने केले होते. ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यात आला होता. त्याचे डिझाइन सदोष होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!