…अन्यथा गुरे गो शाळेत धाडली जाणार; कोलाड पोलिसांचा इशारा
विश्वास निकम
कोलाड : मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड-आंबेवाडी नाक्यावर गेली अनेक वर्ष मोकाट जनावरांचे कळप रस्त्यांच्या मध्यभागी तसेच मार्गाच्या कडेला ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे काही जनावरे अपघातात जीवाला मुकतात तर काही जनावरांमुळे आपघात घडून वाहनचालक व प्रवासी जखमी होतात. त्यामुळे गेली अनेक दिवस येथील ग्रामस्थ सदरच्या समस्येबाबत आक्रमक झाले होते. या गोष्टीचा पाठपुरावा म्हणून कोलाड आंबेवाडी नाक्यावरील ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटना, पत्रकार यांनी विभागीय पोलीस निरिक्षक नितिन मोहिते यांची भेट घेऊन साऱ्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडत यावर उपाययोजना करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली. याच अनुषंगाने विभागातील सर्व पोलिस पाटील, विद्यमान सरपंच यांना पाचारण करून याबाबतची सूचना देण्यात आल्या. ग्रामस्थांनी मोकाट गुरे रस्त्यावर सोडू नये, जी मोकाट गुरे आहेत त्यांचा बंदोबस्त येत्या आठ ते दहा दिवसात संबंधित मालकांनी करावा अन्यथा हि गुरे गो शाळेत धाडली जातील अशी ठाम भूमिका पोलिस निरिक्षक नितीन मोहिते यांनी उपस्थित सरपंच आणि पोलीस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या समोर मांडली आहे.
गेली अनेक दिवस मुंबई गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर मोकाट गुरे रस्त्यावर येऊन अपघातास कारणीभूत ठरत आहेत. या मोकाट गुरांमुळे अपघात देखील घडत असल्याने या समस्येवर उपाययोजना म्हणून कोलाड पोलिस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी कोलाड पोलिस ठाण्यात संबधीत सरपंच यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कोलाड पोलिस निरिक्षक नितिन मोहिते यांनी उपस्थितांना सूचना दिल्या.
यावेळी पोलीस निरिक्षक नितीन मोहिते, अंमलदार नरेश पाटील, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, दिलीप खांडेकर (पहूर), सुरेश जाधव (येरळ), समीर महाबळे (संभे), बबन म्हसकर (पुगाव), रविंद्र मरवडे (तळवली तर्फे अष्टमी), तसेच सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे, शरद दिसले, प्रफुल बेटकर, संजय लोटणकर, दगडु बामुगडे, तुळशीराम शिंदे, गजनान सानप, प्रशांत दापके, महेंद्र वाचकवडे, महेश स्वामी जंगम, श्रीकांत चव्हाण, संजय कामथेकर, शशिकांत मरवडे आदी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच प्राणी मित्र, वृत प्रतिनिधी व डिजिटल मीडिया प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सदरच्या मोकाट गुरे यांचे मालक बेफिकीर असल्याने यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, त्यामुळे वाढते अपघात होत असल्याची तक्रार उपस्थितांनी पुन्हा केली. तसेच महामार्गाचे काम सुरू असल्याने या मोकाट गुरांमुळे अधिक अपघात होत असल्याचे अनेकांनी सांगितले. यावर उपाययोजना म्हणून संबंधित गुरे मालकांना आठ ते दहा दिवसांची सवलत दिली आहे, त्यामुळे जर का दिलेल्या कालावधीत सदर मालकांनी मोकाटगुरांचा बंदोबस्त केला नाही तर स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने त्यांना पकडुन गो शाळेत धाडण्यात येईल असा इशारा कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी दिला.