• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग येथे ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात साजरा

ByEditor

Oct 1, 2024

रायगड जिल्हा परिषद औषधनिर्माण अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

प्रतिनिधी
अलिबाग :
शनिवार, दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सुरुची रिसॉर्ट कुरुळ अलिबाग येथे “जागतिक फार्मासिस्ट दिन” साजरा करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट दिन रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा सन 1985 साली साजरा करण्यात आला होता. त्यानंतर सन 2022 पासून निलेश कार्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली सातत्याने तिसऱ्या वर्षी मोठ्या उत्साहात जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात येत आहे. यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद औषधनिर्माण अधिकारी यांच्यामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. कुरुळ अलिबाग येथील सुरुची रिसॉर्टमध्ये सकाळी १० वाजल्यापासून शासकिय औषधनिर्माण अधिकारी यांची उपस्थिती होती- तेजस पाटिल निवेदक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातील सुमारे 54 जिल्हा परिषद औषधनिर्माण अधिकारी उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील तसेच मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी अलिबाग चेअरमन डॉ. कैलास चौलकर आणि वात्सल्य ट्रस्ट अलिबागच्या श्रीम. सुचेता मेहेंदळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. प्रथम सर्व मान्यवर अधिकारी यांचे स्वागत एक फुलझाड, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून करण्यात आले. त्यानंतर सर्वप्रथम औषध निर्माण अधिकारी संघटना अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य निलेश कार्लेकर यांचे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात औषधनिर्माण अधिकारी यांचे सर्व प्रश्न मांडले. तसेच सर्व औषध निर्माण अधिकारी यांना स्वतंत्र कंप्यूटर, प्रिंटर व इतर सुविधा द्याव्यात अशी मागणी केली. त्याचबरोबर कुशल कंत्राटी पद हे मुळातच चुकीचे आहे, त्यामुळे आमच्या औषध निर्माण अधिकारी यांना अगदी तुटपुंज्या वेतनात काम करावे लागते. त्यामुळे निदान त्यांचे पगार तरी वाढवावे अशी विनंती वजा मागणी केली आणि जिल्हास्तरावर जर हा प्रश्न सुटणार नसेल तर हा प्रश्न राज्य संघटनेमार्फत आरोग्य मंत्र्यापर्यंत नेऊन तो मार्गी लावण्यात येईल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मा. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वंदनकुमार पाटील यांनी आपल्या भाषणात औषधनिर्माण अधिकारी यांच्या कामाची स्तुती केली व जर तुम्हाला काही अडचणी असल्यास मला सांगा त्या मी आनंदाने पूर्ण करीन असे आश्वासन दिले. मा . जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी आपल्या भाषणात इतका भव्य शिस्तबद्ध जागतिक फार्मासिस्ट डे आयोजित करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्वांचे अभिनंदन केले. तसेच डॉ. कैलास चौलकर यांनी आपल्या भाषणाने सर्वांना संघटनेबाबत प्रेरीत केले व समस्त औषधनिर्माण अधिकारी यांच्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण केले.

यानंतर औषधनिर्माण अधिकारी सुविधा धनावडे व संदीप घायाळ यांच्या माध्यमातून जिनियस फार्मसी ऑफिसरसाठी एक लेखी फार्मसी बेस परीक्षा घेण्यात आली. ज्यामध्ये चैतन्य शेजाळ (औषध निर्माण अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र विन्हेरे) हे विजेता ठरले तर श्रीराज निगुडे, ऋतुजा खैरे आणि दिपीका बांगर हे तीन औषध निर्माण अधिकारी अनुक्रमे उपविजेते ठरले.

रायगड जिल्ह्यातील चालू वर्षात औषध निर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ६ जिल्हा परिषद औषधनिर्माण अधिकारी यांना आदर्श औषधनिर्माण अधिकारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात सुदेश पाटील, भाऊलाल राठोड, पूजा माने, वैभव पाटील, सुशांत कुरकुंडे आणि श्रीकांत भोसले यांना मा. अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर राज्यस्तरावर कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे निलेश कार्लेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुविधा धनावडे यांनी आपल्या छान शब्दात सर्व आदर्श औषध निर्माण अधिकारी यांच्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले आणि पुरस्कार सोहळा खूप आनंदात पार पाडला.

सेवानिवृत्त औषधनिर्माण अधिकारी संतोष बोडके यांना “जीवन गौरव” हा महत्वाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला. वात्सल्य ट्रस्ट, अलिबाग करीता संघटनेमार्फत दहा हजार रुपयांचा धनादेश सुचेता मेहेंदळे यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. त्यानंतर मेहेंदळे मॅडम यांनी ट्रस्टमध्ये असलेल्या मुलांबाबत तसेच ट्रस्टबाबत उपस्थितांना माहिती दिली. दीपिका बांगर यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर उपस्थित औषधनिर्माण अधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. श्रीराज निकुडे यांनी आपल्या शैलीत कामावर हजर होण्याबद्दलचा अनुभव सांगितला. तसेच खुशबू अगरवाल यांनी घर सांभाळून काम करणाऱ्या महिलांबाबत आदर व्यक्त करत वेळोवेळी आपले स्वतःचे आरोग्य कसे सांभाळावे याबद्दल मार्गदर्शन केले.

भोजनाच्या विश्रांतीनंतर संदिप घायाळ यांनी सर्व नवनियुक्त औषधनिर्माण अधिकारी यांना आपल्या कामाचे स्वरुप प्रोजेक्टरद्वारे खूप छान समजावून सांगितले तसेच त्यांच्या असलेल्या शंकांचे योग्य निरसन केले. यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम हसत खेळत पार पडला. ज्यामध्ये सर्व औषध निर्माण अधिकारी यांनी फनी गेम्स, गायन आणि डान्समध्ये भाग घेऊन आपापले कलागुण सादर केले. काहींनी आपल्या गायनाने तर काहींनी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ पाडली.

कार्यक्रमाच्या शेवटी दिपिका बांगर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या अध्यक्ष निलेश कार्लेकर, जितू पाटील, सुदेश पाटील, सूर्यकांत चौधरी, देवा इंगळे, विकास पाटील, सतीश पाटील, सुविधा धनावडे, अपर्णा साजेकर, वैभव पाटील व सर्व औषधनिर्माण अधिकारी, सुत्रसंचालक, व इतर सर्वांचे आभार मानले व हा कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले. अशारीतीने हा अभूतपूर्व, अद्वितीय जागतिक फार्मासिस्ट दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!