• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चित्रलेखा पाटलांना कुर्डुसमध्ये गाव बंदी -राजा केणी

ByEditor

Oct 2, 2024

तरुणांविषयी बदनामीकारक वक्तव्याने पोयनाड, पेझारीमध्ये संताप

गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांचे आश्वासन

अमुलकुमार जैन
रायगड :
शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी पेझारी येथील महिला मेळाव्यात तरुणांबद्दल अतिशय बदनामीकारक वक्तव्य केले होते, त्याचे तीव्र पडसाद आज अलिबाग तालुक्यात उमटले. पेझारी, बांधण, मेढेखार येथील सात तरुण एचआयव्ही बाधित असल्याचा दावा चित्रलेखा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे एचआयव्ही बाधित तरुण कोण? याबद्दल अलिबाग तालुक्यातील नाक्यानाक्यावर, घराघरात चर्चा सुरू आहे. प्रत्येक तरुणाकडे संशयास्पद पाहिले जात असल्याने येथील तरुणांची बदनामी करणाऱ्या चित्रलेखा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली येथील तरुणांनी पोयनाड पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले. पोयनाड पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक संतोष दराडे यांनी याची दखल घेत गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

पेझारी येथे मंगळवारी (दि.1) शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यामध्ये चित्रलेखा पाटील यांनी दारू आणि ड्रग्सबद्दल बोलताना या भागातील तरुणांना एड्सची लागण झाली असल्याचा दावा केला. हा तरुणाईचा अपमान असून त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चित्रलेखा पाटील यांनी येथील तरुणांसमोर येऊन जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना गावबंदी करण्यात यावी, असा निर्धार यावेळी करण्यात आला. गावांच्या वेशीवर गावबंदीचे फलक लावण्यात येतील, या भागातील एकही गावांमध्ये चित्रलेखा पाटील यांना फिरकू देणार नाही, असे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी जाहीर केले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.

कुर्डुस परिसरातील सरकारी नोकरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. शिक्षक, पोलिस, ग्रामसेवक, तलाठी या बरोबरच येथील कंपन्यांमध्ये काम करणारा मोठा वर्ग आहे. या वर्गाकडून चित्रलेखा पाटील याचा निषेध केला जात आहे. या परिसरात ड्रग्सचे प्रमाण वाढलेले असून ड्रग्सच्या व्यसनाबरोबर 7 तरुणांना एचआयव्हीची लागण झालेली आहे, त्यामुळे महिलांनी सावधान राहण्याचे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे. मंगळवारी केलेली भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात असंतोषाचा भडका उडाला. प्रत्येकजण ड्रॅग्सच्या आहारी आणि एचआयव्ही बाधित तरुण कोण आहे याबद्दल चर्चा करत होते. यातूनच कुर्डुस परिसरातील तरुणांनी एकत्र येत पेझारी नाका येथे चित्रलेखा पाटील यांचा तीव्र निषेध केला. यावेळी पेझारी नाक्यावर तरुणांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे पोयनाड, पेझारी नाक्यावर पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आहे. आज सकाळी येथे पोलिस छावणीचे स्वरूप होते.

यावेळी बोलताना राजा केणी यांनी पेझारी नाक्यावर दारूचे प्रमाण वाढले आहे तर ग्रामपंचायत तुमच्या हातात वर्षानुवर्षे आहे, तेव्हा तुम्ही झोपा काढल्या का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. हा परिसर सर्वात सुशिक्षित म्हणून ओळखला जातो. चित्रलेखा पाटील यांच्या बेजबाबदार वक्तव्याने येथील तरुणांना लग्नासाठी मुली देतानाही पालक वर्ग विचार करतील. यामुळे येथील तरुणांचे आयुष्य बरबाद होणार असून यास सर्वस्वी चित्रलेखा पाटीलच जबाबदार असतील, असे राजा केणी यांनी म्हटले आहे. येथील तरुणांना नोकरी धंद्याला लावण्याचे सोडून निवडणुका आल्यावर मेळावे घेत आपल्याला येथील महिलांचा आणि नागरिकांबद्दल किती आपुलकी आहे, असा भास निर्माण केला जात आहे. विकासाच्या भूलथापा देणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने पेझारी, पोयनाड नाक्यावर महिलांसाठी स्वच्छतागृह का बांधले नाही? असा प्रश्न करीत राजा केणी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या दिखाऊ राजकारणाबद्दल शंका उपस्थित केली आहे. कोणी तरी दिलेल्या अर्धवट माहितीच्या आधारे आमच्या गावांची नावे घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे विचारत जोपर्यंत चित्रलेखा पाटील येथील तरुणांच्या समोर येऊन जाहीर माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधातील आंदोलन चालूच राहणार असल्याचाही इशारा राजा केणी यांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!