• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वाढदिवसाचा केक कापला…मात्र बर्थ-डेच अनिकेतच्या आयुष्याचा अंतिम दिवस ठरला!

ByEditor

Oct 2, 2024

२९ वर्षीय तरुणाचा न्हावा-खाडी परिसरात अपघात; पलटी खाऊन फॉर्चुनरचा चक्काचूर

फॉर्च्युनर कारची अवस्था पाहून लक्षात येते दुर्घटनेची भीषणता

घनःश्याम कडू
उरण :
मित्रांसह वाढदिवसाचा केक कापून आपल्या फॉर्च्युनर कारमधून घरी परतणार्‍या तरुणावर काळाचा मोठा घाला पडला आहे. अपघातात या 29 वर्षीय तरुणाचा वाढदिवशीच मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील न्हावा खाडी परिसरात घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

अनिकेत बाळू पवार असे या अपघातात मृत तरुणाचे नाव असून रविवार, दि. 29 सप्टेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली. या अपघातात फॉर्च्युनर कारमधील इतर 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अनिकेतचा वाढदिवशीच अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनिकेत पवार हा उलवे येथील एका ट्रान्स्पोर्टरकडे चालक म्हणून काम करत होता. सोमवार, दिनांक 30 सप्टेंबर रोजी अनिकेतचा वाढदिवस असल्याने रविवारी मध्यरात्री त्याच्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. त्यासाठी अनिकेत आपल्या मित्रांसह कारने न्हावा गावात गेला होता.

यावेळी अनिकेतने वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सर्व मित्र रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांची कार न्हावा गाव येथून उलवेच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना, न्हावा गावच्या हद्दीत एका वळणावर अनिकेतचे कारवरील नियंत्रण सुटले. ही भरधाव कार दोन ते तीन वेळा पलटी झाली. या अपघातात अनिकेतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जखमी अवस्थेत बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. न्हावा शेवा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात अनिकेतचे मित्र किरकोळ जखमी झाले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!