• Wed. Jul 16th, 2025 1:27:11 AM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिवाजी पार्कवर धडाडणार ठाकरेंची तोफ! शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार

ByEditor

Oct 3, 2024

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेकडून दरवर्षी मेळावा घेण्यात येत असतो. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला संपूर्ण राज्यभरातून शिवसैनिक उपस्थिती लावत असतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही दसरा मेळाव्याची परंपरा आजही सुरू आहे. विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक गर्दी करत असतात. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदेंकडे गेले. त्यासोबतच दसरा मेळावे सुद्धा दोन वेगवेगळे सुरू झाले.

दसरा मेळाव्यासाठी आपल्याला शिवाजी पार्कात जागा मिळावी यासाठी शिवसेनेकडून मुंबई मनपाकडे अर्ज करण्यात येत असतो. अशाच प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई मनपाला परवानगीसाठी अर्ज केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेल्या या अर्जावर आता मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजेच उद्धव ठाकरेंची तोफ शिवाजी पार्कात धडाडणार आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हे नेमके काय बोलतात? कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात? हे पहावं लागेल.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडून दसरा मेळावा सुद्धा घेण्यात येतो. यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसी मैदानावर घेतला होता. यंदा शिंदेंच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेकडे शिवाजी पार्कचे मैदाना दसरा मेळाव्यासाठी मिळावे यासाठी अर्ज करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आता ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कात होणार आहे. तर शिंदेंचा दसरा मेळावा हा बीकेसी किंवा आझाद मैदानात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 येत्या काही दिवसांत होणार आहेत. या निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांत होणार असून आचारसंहिता लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आता दसरा मेळाव्याच्या माध्यमातून नेते मंडळी विविध मुद्यांवर भाष्य करताना दिसून येणार आहेत. आता या निवडणुकीपूर्वीच्या दसरा मेळाव्यात टीकेचे बाण कोण कोणावर कशा प्रकारे सोडतं हे पहावं लागेल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!