शहरातील विकास कामांना चालना देणार -ॲड. राजीव साबळे
सलीम शेख
माणगाव : माणगाव नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकला असून नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला शोभना सुर्वे तर उप नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाच्या हर्षदा सतिष सोंडकर यांची बिनविरोध निवड होऊन त्या विराजमान झाल्या असून या नगरपंचायतीवर महिला राज आला आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अँड.राजीव साबळे यांनी शहरातील विकासकामांना चालना देणार असल्याचे सांगितले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे व उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

माणगाव नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) व भाजप पक्षाच्या महायुतीचे वर्चस्व आहे. या नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व माजी उपनगराध्यक्ष राजेश मेहता यांनी आपल्या पदांचा ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्यावर या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या पदांसाठी दि. ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक होऊन निवडणुकीचे पीठासीन अधिकारी तथा माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी नगराध्यक्ष पदासाठी शर्मिला शोभन सुर्वे यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने शर्मिला सुर्वे या माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्ष पदासाठी हर्षदा सतिष सोंडकर यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाल्याने उपनगराध्यक्षपदी हर्षदा सोंडकर या बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करून त्यांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित नगराध्यक्षा-उपनगराध्यक्षा यांचे अभिनंदन केले.
या निवड प्रक्रियेवेळी माणगाव नगरपंचायत कार्यालय याठिकाणी राज्य शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलिमा घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे, तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, शिवसेना शहराध्यक्ष सुनील पवार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन वाढवळ, विरेश येरुणकर, प्रताप घोसाळकर, प्रदीप मोरे, माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, रत्नाकर उभारे, राजेश मेहता, नरेंद्र गायकवाड, कृष्णा गांधी, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुविधा खैरे, नगरसेविका लक्ष्मी हिलम, नगरसेविका ममता थोरे, नगरसेविका नंदिनी बामगुडे, नगरसेविका रिया उभारे, नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेवक अजित तारलेकर, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक मनोज पवार, माजी नगरसेवक सिराज परदेशी, माजी नगरसेवक नितीन बामगुडे, माजी नगरसेविका माधुरी मोरे, प्रसाद धारिया, सागर पाटील आदींसह महायुतीचे कार्यकर्ते, मित्र, मैत्रिणी, परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वानी नवनिर्वाचित नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे व उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर माणगाव बाजारपेठेतून नगराध्यक्षा-उपनगराध्यक्षा यांची गाडीतून वाजत, गाजत, नाचत मिरवणूक काढण्यात आली. या निवडीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. राजीव साबळे यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या विविध विकास कामांची माहिती देताना या पुढेही माणगाव शहरातील विकास कामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. भरत गोगावले, खा. सुनील तटकरे यांच्या माध्यमातून तसेच नगरपंचायतीच्या विविध योजनांतून विकास कामांना चालना दिली जाईल असे सांगत शहरातील सर्व नागरिकांना भेडसावणारा पूर रेषेचा म्हणजेच निळ्या रेषेचा प्रश्नाबाबत आपण शासनाला निवेदन दिले असून त्याचे पत्र आल्याला प्राप्त झाले असून या प्रश्नासाठी शासनाकडून शहराची पाहणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.