विनायक पाटील
पेण : आजच्या युगामध्ये संगणकाचे ज्ञान असणे सर्वांसाठीच आवश्यक आहे. आपल्या ग्रामीण भागातील शाळांना मात्र असे संगणक व जरुरी प्रोग्राम्स व सॉफ्टवेअर्स यांनी परिपूर्ण लॅबोरेटरीज आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे शक्य होत नाही. गेली अनेक वर्षे सीएफआय हि पेणमधील संस्था अशा ग्रामीण भागातील शाळांना संगणकीय लॅबसाठी मदत करीत आहे.

गेल्या वर्षामध्ये एकूण १६ शाळांमध्ये सीएफआयने संवाद साधणारा फलक (Interactive TV Panels) बसवून देऊन ऑडीओ व व्हिजुअल सर्वांगीण शिक्षणाची सुरवात केली. आता सीएफआयने आयआयटी बॉम्बेच्या संयुक्त विद्यमाने ऑडीओ व व्हिजुअल संगणकीय ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे. साई येथील सार्वजनिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शाळेमध्ये स्पोकन ट्युटोरिअल्स आयआयटी बॉम्बे यांच्यासोबत मिळून सीएफआय या संस्थेने शाळेत बसवून दिलेल्या संवाद साधणाऱ्या फलकावर (Interactive TV Panel) मुलभूत तसेच आधुनिक संगणक कोर्सेस चालू करून दिले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सराव करण्याकरिता संगणकही बसवून दिले आहेत.
या कोर्सेसच्या अभ्यासांती झालेल्या ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्या त्या कोर्सचे आयआयटी बॉम्बेचे प्रमाणपत्र दिले जाईल. ज्याचा विद्यार्थ्यांना फायदा तर होईलच पण अत्यावश्यक असे संगणकीय कौशल्य सुद्धा त्यांना प्राप्त होईल. हे कोर्स शिकवण्यासाठीचे प्रशिक्षण शाळेतील शिक्षक व सीएफआयचे सोशल वर्कर यांना आयआयटी बॉम्बे तर्फे देण्यात आले आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठीचे मार्गदर्शन सीएफआयचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख व स्पोकन ट्युटोरिअल्स आयआयटी बॉम्बेच्या प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी केले.