‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. 2 चे पुरस्कार प्रदान
रायगडमधील दोन शाळा मानकरी
शासकीय शाळा गटामध्ये रा.जि. प. शाळा वडगाव द्वितीय तर मोहनलाल सोनी विद्यालय खाजगी गटात तृतीय
अभय पाटील
बोर्ली पंचतन : सीएम म्हणजे लोक चीफ मिनिस्टर म्हणतात, पण मी कॉमनमॅन समजतो तर गुरूंचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण आहे. शाळांचा दर्जा वाढावा यासाठी शिक्षण विभाग करीत असलेले कार्य उल्लेखनीय आहे. यापूर्वी शाळांसाठी खुप कमी प्रमाणात योजना राबविल्या जातात होत्या, परंतु आमच्या सरकारने शाळांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले. राज्यातील शाळांसाठी राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. 2 चे पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळा गटामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या वडगाव, ता. खालापूर प्रशालेस मुंबई विभागातून द्वितीय क्रमांक व श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्लीपंचतन, ता. श्रीवर्धन प्रशालेस खाजगी शाळा गटामध्ये मुंबई विभागात तृतीय क्रमांक प्राप्त झाला. मुंबई येथील जमशेद भाभा सभागृह, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे सोमवार, दि. 14 ऑक्टोबर रोजी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. 2 चे पुरस्कार प्रदान सोहळा शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार विजय शिवतरे, माजी खासदार यामिनी जाधव, शिक्षण उपसंचालक मुंबई संदीप संगवे, सहाय्यक उपसंचालक सुनील सावंत, रायगड शिक्षणाधिकारी प्राथमिक पुनीता गुरव, उप शिक्षणाधिकारी संतोष शेडगे, श्रीवर्धन माजी गटशिक्षणाधिकारी तथा पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून विजेते प्रशालेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील दोन शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळा गटामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या वडगाव, ता. खालापूर प्रशालेने मुंबई विभागातून द्वितीय क्रमांक पटकाविला त्यांना 15 लाख रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र, सन्मानिन्ह तसेच श्री मोहनलाल सोनी विद्यालय व श्री नानासाहेब कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालय बोर्ली पंचतन, ता. श्रीवर्धन प्रशालेस खाजगी शाळा गटामध्ये मुंबई विभागात तृतीय क्रमांक प्राप्त झाला. त्यांना 11 लाख रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र, सन्मानिन्ह देऊन गौरविण्यात आले.
बोर्ली पंचतन प्रशालेच्यावतीने जनता शिक्षण संस्था कार्याध्यक्ष महमद मेमन, उप कार्याध्यक्षा शितल तोडणकर, खजिनदार उदय बापट, संचालक रमेश घरत, श्रीकांत तोडणकर, कुमार गाणेकर, प्राचार्य बाबासाहेब यळमंते, तसेच शिक्षक अभिजीत मुकादम, ज्ञानदीप भोईनकर, अमित पाटील, माणिक जाधव, विक्रांत शिरकर यांनी पुरस्कार स्विकारला.