२८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार
घन:श्याम कडू
उरण : विधानसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीस शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी पाठींबा दिला असून सोमवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उमेदवारी एबी फॉर्म मिळणार आहे.
उरण, पनवेल, पेण तालुक्यातील प्रस्तावित सेझ प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दिनांक १६/८/२००७ रोजी कोकणभवन आयुक्त कार्यालय बेलापूर येथे शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला होता. जवळपास लाखभर शेतकऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेत तत्कालीन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, विश्वास म्हात्रे, प्रकाश तांडेल, गुरुनाथ पाटील, रामचंद्र देवरे यांच्यासह १६ जणांना सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आरोपी करण्यात आले होते. याबाबतची न्यायालयीन कारवाई सुरु आहे. मात्र वरील सात जणांना जिल्हा न्यायालय बेलापूरकडून न्यायालयीन कोठडी सुनावून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर काल रात्री मनोहरशेठ भोईर आणि सहकाऱ्यांची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांनी आंनद व्यक्त केला.
यानंतर अटक केल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळोजा जेलजवळ गर्दी केली होती. सायंकाळी उशिरा सुटका झाल्यानंतर नवीन शेवा शाखेत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी अनवधानाने आम्हांला अटक झाल्यानंतर तळोजा जेलमध्ये शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांची भेट झाली. त्यांनी आमची आस्थेने विचारपूस करून घरगुती जेवण व इतर सहकार्य करून आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पाठींबा असेल असे सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज सोमवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी भरण्यात येईल असे कार्यकर्त्यांना सांगितले.
उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी माजी आमदार विवेक पाटील हे जेलमध्ये असूनही आजही तोच रुबाब दिसत असल्याने टायगर अभी जिंदा असल्याचे सांगत, हे कोणाचे षडयंत्र असेल नसेल पण कधीकधी वाईटातुनही चांगले होत असल्याचा अनुभव आम्हाला आला आहे. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनोहरशेठ भोईर यांना आमदार केल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही असे सांगितले.
यावेळी तालुका प्रमुख संतोष ठाकूर, जगजीवन भोईर, दीपक भोईर, बळीराम ठाकूर, कमलाकर तांबोळी, कृष्णा घरत या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.