भैरवनाथ मंदिरामुळे पर्यटनाला उभारी; श्रीवर्धनकरांची मंदिराची प्रतीक्षा संपली
श्री सिद्धनाथ व श्री केदारनाथ या दोन मंदिरांसाठी एक कोटी बत्तीस लाखाचा निधी
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील ‘दिवेआगर’ हे जगप्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ असून, याच ठिकाणी श्रीसिद्धनाथ भैरव व श्रीकेदारनाथ भैरव ही दोन मंदिर आहेत. या मंदिरांच्या उभारणीसाठी एक वर्षापूर्वी तब्बल एक कोटी बत्तीस लाखाचा निधी आला होता. मात्र, अंतर्गत वादामुळे मंदिर बांधकामाला सुरुवात झाली नव्हती. वेळोवेळी जनमानसातून मंदीर कधी होणार अशी विचारणा केली जात होती. शेवटी हा वाद मिटला आणि मंदिराच्या बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे.
दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिर, रूपनारायण, पंचमुखी महादेव, उत्तरेश्वर पंचमुखी यांच्याप्रमाणे श्रीसिद्धनाथ व श्रीकेदारनाथ या मंदिरांना देखील वैभवसंपन्न असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या मंदिराच्या नूतनीकरणाने कोकणातील विकासाला चालना मिळण्यासाठी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, या कामाला या-त्या कारणाने चालढकलपणा होत असल्याने, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देखील बांधकामाचा श्रीगणेशा झालाच नाही.
येथील भैरवनाथाची यात्रा गावातील प्रमुख उत्सव आहे. त्यामुळे विशेषतः दोन दिवस भरणाऱ्या वैशिष्ट्य पूर्ण यात्रेला गावकऱ्यांची व राज्यभरातील भाविकांची अलोट गर्दी असते. मागील यात्रोत्सवाला मंदिरांच्या नूतनीकरणाला सुरुवात होऊन कामाला गती मिळावी आणि येणाऱ्या यात्रे पर्यंत काम पूर्ण व्हावे. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. मात्र, अनेक मतभेद असल्याने मंदिराचे बांधकाम राहूनच गेले. येथे भैरवनाथाच्या मंदिरांची उत्सुकता पंचक्रोशीतील सर्वांनाच लागली असताना, आता मंदिरांच्या बांधकामाला सुरुवात झाल्याने भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
भैरवनाथ मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. ग्रामस्थांनी या कामात पुढाकार घेतला असून यंदाच्या यात्रोत्सवापूर्वी मंदिर बांधकाम पूर्ण होईल. यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
-सिद्धेश कोजबे
सरपंच, दिवेआगर.