• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उद्या आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबूशेठ खानविलकर करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश

ByEditor

Oct 27, 2024

पाच हजार कार्यकर्ते प्रवेश कार्यक्रमाला राहणार उपस्थित, बाबूशेठ खानविलकरांची माहिती

निजामपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा

सलीम शेख
माणगाव :
महाड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार हादरा बसला असून मतदार संघाचे पक्षाचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर हे उद्या सोमवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यादिवशी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी आपल्या सोबत पाच हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रवेशकर्ते बाबूशेठ खानविलकर यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिली. खानविलकर यांच्या या पक्ष प्रवेशाच्या निर्णयाने निजामपूर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार हादरा बसला आहे.

येणाऱ्या २० नोव्हेंबरला १९४ महाड विधानसभा मतदार संघाची निवडणूक होत असून या मतदार संघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. संबंध रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राचे या मतदार संघाकडे लक्ष लागून राहिले आहे. या मतदार संघात महायुतीचे उमेदवार आ. भरत गोगावले व महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्यात खरी लढत होणार आहे. या निवडणुकीच्या धामधुमीत महाड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून महाड येथे त्यांचा असंख्य कार्यकर्त्यांसमवेत पक्ष प्रवेश होणार आहे. बाबूशेठ खानविलकर यांना मानणारा मोठा वर्ग निजामपूर विभागात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड मतदार संघाचे अध्यक्षपद मिळाल्यावर त्यांनी निजामपूर, गोरेगाव विभागासह गेल्या चार वर्षात महाड व पोलादपूर तालुकाही पिंजून काढल्याने मतदार संघात त्यांनी आपले अनेक समर्थक कार्यकर्ते तयार केले आहेत. गेल्या अनेक निवडणुकांमधून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह खा. सुनील तटकरे व माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गेली अनेक वर्षे ते राजकारणाच्या माध्यमातून समाजकरण करीत असल्याने त्यांनी मतदार संघातील विविध गावांतून आपली विशेष अशी ओळख निर्माण केली आहे. बाबूशेठ खानविलकर यांचा उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होत असल्याने हे महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्यासाठी दुधात साखर पडल्या सारखं आहे. आपला सोमवारी पक्ष प्रवेश सोहळा पार पडल्यावर मतदार संघातून विशेष करून निजामपूर विभागातून पक्ष प्रवेशाचा सपाटा लावला जाईल असे खानविलकर यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!