शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र
मुंबई : पेणमधील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई करा अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने उपसचिव सचिन पारसनिस यांनी या संदर्भातील तक्रार दिली आहे. त्यामुळे उरणपाठोपाठ पेणमध्येही महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पेण विधानसभा मतदारसंघातून प्रसाद भोईर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर हेच आहेत. मात्र तरीही शेतकरी कामगार पक्षाचे अतुल म्हात्रे हे महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोटो त्यांच्या प्रचारात वापरत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता परिशिष्ट १ भाग ७ आदेश क्रमांक (पाच) नुसार हा गंभीर गुन्हा असल्याचे असल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे अतुल म्हात्रे यांच्यावर मतदारांमध्ये संभ्रम निम्राण केल्या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती ठाकरे गटाने केली आहे.
काही दिवसांपूर्वी उरणमधील शेकाप उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या संदर्भात अशीच तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र अद्याप या संदर्भात कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. निवडणूक प्रचार संपत आला तरी महाविकास आघाडीतील मतभेद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
